ठाणे : महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, रविवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात प्रचार रॅली काढली. मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत पोहोचून त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आणि मतदारांशी संवाद साधला. आनंदनगर भागातून दुपारी ३ च्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. हाती भगवे झेंडे घेतलेले दुचाकीस्वार शिवसैनिक आणि मागे उघड्या जीपमध्ये ठाणेकरांना अभिवादन करणारे आदित्य ठाकरे, असे चित्र होते. त्यांच्यासोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते होते. कोपरी पुलावरून तीनहातनाका, मुलुंड चेकनाका, पडवळनगर, किसननगर, आयटीआय सर्कल, वागळे इस्टेट डेपो, लोकमान्यनगर, खोपट, चंदनवाडी, मनपा चौक, रायगडआळी, नौपाडा, गावदेवी मैदान, माजिवडा आणि कोलबाडमार्गे संध्याकाळी रॅली जांभळीनाक्यावर पोहोचली. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी उमेदवारांनी तसेच शिवसैनिकांनी या युवा नेत्याचे स्वागत केले. या चौकातील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला त्यांनी आदरांजली अर्पण केली आणि आनंद आश्रमात जाऊन त्यांनी दिघे यांच्या स्मृतीस अभिवादन केले. कार्यकर्त्यांशी हितगुज करून ते मार्गस्थ झाले. (प्रतिनिधी)\मुख्यमंत्री सभागृहात, ठाकरे रस्त्यावरआदित्य ठाकरे यांचा रोड शो आणि मुख्यमंत्र्यांची सभा एकाच वेळी सुरू होती. सरस्वती महाविद्यालयात मुख्यमंत्र्यांची सभा सुरू असताना ठाकरे यांची रॅली तेथून मार्गस्थ झाली. महाविद्यालयासमोरून रॅली जात असताना शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने हा परिसर दणाणून गेला. नौपाडा परिसरातील मनसे कार्यालयासमोर रॅली पोहोचली, तेव्हाही असेच चित्र पाहावयास मिळाले.
आदित्य ठाकरेंचा रोड शो मधून संवाद
By admin | Published: February 20, 2017 5:54 AM