ठाणे : नवीन वर्षांच्या आरंभी शहापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात डायलेसिस आणि आयुष आदी विभागांची सेवा सक्रीय करण्यात आली आहे. या दोन्ही विभागांचे उद्घाटन आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार उपस्थित होते.
सध्याच्या परिस्थितीत बदल लेली जीवनशैली आत्मसात केल्यामुळे मूत्र पिंड निकामी असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यांना औषधोपचारा सोबत आठवड्यातून दोन, तीन वेळा डायलेसिस करावे लागत आहे. त्यास अनुसरून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देत ग्रामीण, दुर्गम भागातील रूग्णांना त्याचा मोठ्याप्रमाणात लाभ होणार असल्याचे या शहापूर उप जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ . प्रसाद भंडारी यांनी लोकमतला सांगितले.
रूग्णालयात सुरू केलेल्या आयुष विभागामध्ये आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी या विभागांचा समावेश आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे माणसांच्या आहार आणि विहार म्हणजेच खाण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळांमध्ये बदल होत असल्यामुळे हे आजार वाढले आहेत. ऋतुचर्या, दिनचर्या पालन न करल्यामुळे सुद्धा असाध्य रोग होतात. आधुनिक उपचार पद्धतीने आजार बरे होत नसतील तर आयुर्वेदिक, युनानी तसेच होमियोपॅथी औषधोपचाराने सुद्धा आराम मिळत असतो. योगा, प्राणायाम, ध्यान करणे सुद्धा फायदा होतो. औषधोपचारासोबत पथ्य आहाराचे सेवन करणे, अपथ्य आहार न घेणे ह्या सर्व गोष्टींमुळे आजार बरे होत असेही डॉ. भंडारी यांनी स्पष्ट केले.