डोंबिवली : वृक्षप्रेमी मंडळींना एकत्र आणणे, झाडांविषयी त्यांचे अज्ञान दूर करणे, प्रत्यक्ष रोपे, कंद, बिया यांचे आदान प्रदान करणे, यासाठी झाडांची भिशी ही अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे. भारतीय मजदूर संघ, ठाणे जिल्हा पर्यावरण मंच यांच्यातर्फे झाडांची भिशी हा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू केल्याची माहिती पर्यावरण मंचाचे कोकण विभागाचे प्रभारी भरत गोडांबे यांनी दिली.
व्हॉट्सअॅप ग्रुपवरून झाडांविषयी जागृती केली जाईल. बागकामाविषयी दर आठवड्याला नवीन माहिती दिली जाईल. पाणी व्यवस्थापन, झाडांची निवड याविषयी माहिती देणे, घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन, त्यापासून खतनिर्मितीची माहिती देणे, एखाद्या झाडाची माहिती नसेल तर ती माहिती करून घेणे, वृक्ष आधारित पुस्तकांचे एक छोटेखानी ग्रंथालय सुरू करणे यासंदर्भात सविस्तर चर्चा या ग्रुपद्वारे करण्यात येणार आहे, असे गोडांबे म्हणाले.
झाडे लावण्याची मोहीम अनेक जण राबवितात. मात्र, त्यापूर्वी त्या झाडांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. हवामान उष्ण असताना झाडांची कापणी केल्यास ती मरतात. उन्हामुळे झाडांवर ताण येतो. त्यामुळे झाडांची कापणी पाऊस सुरू झाल्यानंतर करावी, असा संदेश या ग्रुपद्वारे देण्यात आला आहे. महिन्याच्या पहिल्या रविवारी ग्रुपची सभा होणार आहे. यावेळी परिसरातील उद्यानांमधील झाडांची माहिती दिली जाणार आहे. आपण ज्या परिसरात राहतो, तेथील झाडांची यादी करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या परिसरातील हरित संपत्तीची नोंद होईल, हा या ग्रुपमागील हेतू आहे, असेही त्यांनी सांगितले.
टपाल पाकिटाद्वारे बियांची देवाणघेवाण : विविध झाडांच्या बिया असलेल्या व्यक्तींनी झाडांची भिशी या ग्रुपवर तसे नमूद करावे. त्यामुळे बिया हव्या असलेल्या व्यक्तीने त्यांना एक रिकामे पाकीट टपाल तिकीट चिकटवून पाठवावे. ते त्या पाकिटात बिया भरून पुन्हा पाठवतील. साधारण अशी पद्धत अवलंबली आहे. या पद्धतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ही गोडांबे यांनी सांगितले.