डोंबिवली : शनिवारपासून केडीएमटी उपक्रमाने उसाटणेमार्गे पनवेल बस सुरू केली असून लवकरच वाशी आणि बेलापूर मार्गावर बस सोडण्यात येणार असल्याची घोषणा विद्यमान सभापती मनोज चौधरी यांनी केली आहे. कल्याणमधून बस सोडता, तर मग डोंबिवलीमधून का नाही, असा सवाल डोंबिवली मनसे शहराध्यक्ष तथा परिवहनचे माजी सभापती राजेश कदम यांनी केला आहे. डोंबिवलीकरांनी महापालिकेचे घोडे मारले आहे का? बस न सोडल्यास मनसे स्टाइलने समाचार घेऊ, असा इशारा कदम यांनी उपक्रमाला दिला आहे.
मिशन बिगिनअंतर्गत शनिवारपासून लांब पल्ल्यांच्या मार्गावर बस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सभापती चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण-पनवेल मार्गावर बस वाहतूक सुरू झाली. यावेळी परिवहनचे सदस्य अनिल पिंगळे आणि उपक्रमाचे अधिकारी उपस्थित होते. लवकरच कल्याण-वाशी, कोकण भवन, कल्याण-ठाणे मार्गावर बस चालवल्या जातील, अशी घोषणा चौधरी यांनी केली. यावेळी चालक आणि वाहकांना तसेच प्रवाशांना सोशल डिस्टन्सचे नियम आणि खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले. कल्याणप्रमाणे डोंबिवलीहूनही लांब पल्ल्यांच्या गाड्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी कदम यांनी केली आहे. डोंबिवलीकर कर भरत नाही का? मग डोंबिवलीहून पनवेल, वाशी, ठाणे बससेवा का सुरू करत नाही? असे सवाल कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. दोन शहरांमध्ये महापालिका दुजाभाव का करते? डोंबिवली पनवेल, वाशी, ठाणे बससेवा सुरू झालीच पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.