ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक खरमरीत पत्र धाडले आहेत. या पत्रात एक आमदार लोकप्रतिनिधी या नात्याने आपणांस हे कळविताना अत्यंत दु:ख होत आहे कि, मुंब्रा परिसराचे आपण वाटोळे करायला घेतले आहे असे दिसते. पोलीस आयुक्त असो, नाही तर महापालिका आयुक्त असो आपण मुंब्रा पूर्णपणे ड्रग्जच्या जाळ्यात अडकवत चालले आहात. तसेच, मुंब्य्रात महापालिकेच्या काही राक्षसी महत्वांकांक्षेपोटी एकेका गल्लीत २०-२० अनाधिकृत बांधकामे सुरु असल्याचा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केला आहे.
गेली १४ वर्षे आम्ही दाबून ठेवले होते. पोलीस अधिकारी देखिल आम्हांला सहकार्य करायचे. ड्रग्जचा व्यवहार जवळ-जवळ बंद करण्यात आला होता. आता ड्रग्जमधून देखिल हफ्ते घ्यायला सुरुवात झाली आहे. अनधिकृत बांधकाम लक्की कंपाऊंड दुर्घटनेनंतर जवळ-जवळ बंद झाले होते. परंतु आपल्या काही अधिका-यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेपोटी आता एकेका गल्लीत २०-२० बांधकामे सुरु आहेत. मुंब्रा जेव्हा मी हातात घेतले तेव्हा पाण्याचा त्रास होता, विजेचा त्रास होता, रस्त्यांचा त्रास होता. या तिन्ही गोष्टींवर मात करुन मुंब्रा शहर हे नावारुपाला आणले. सध्या इतक्या अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत तसेच त्या आपल्या निदर्शनास देखील आणून दिल्या जात आहेत. परंतु आपण त्यावर कुठलीही कारवाई करतांना दिसत नाहीत. हे खरं आहे कि, मी विरोधी पक्षातील आमदार आहे. हे देखिल खरे आहे कि, मी सरकारवर टिका करतो. म्हणून या शहराचे आपण वाटोळे करणार का? असा थेट सवालच त्यांनी या पत्राच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
शहराची आजची परिस्थिती बघता गल्ली बोळांमध्ये ड्रग्ज विकले जात आहेत. गल्ली बोळांमध्ये अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. साईटवर रिव्हॉल्वहर काढली जात आहे. मारामारीच्या घटना घडत आहेत. आता याचा पोलिसांना आणि पालिकेतील अधिकाऱ्यांना राग येणार. पण, शेवटी हे शहर जसे होत, तसे आता राहिलेले नाही. हे शहर बदलले आहे. इतक्या अनधिकृत इमारती उभारल्या जात असतील तर पाणी टंचाई उद्भवणार. ती कशी हाताळायची. रस्ते खोदले जातात ते कसे सांभाळायचे. ड्रेनेजचा प्रॉब्लेम येतो, रस्त्यावर घाण पसरलेली असते, कचरा पसरलेला असतो त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पण तुम्ही दोघे जबाबदार आहात हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. कि, एक शहर आपण राजकारणापोटी बर्बाद करीत आहोत. या शहराचे भविष्य बर्बाद करीत आहोत. कोणितरी तुम्हांला विचारणारा असेलच आज नाहीतर उद्या. असा इशाराही त्यांनी दिला आहे.