लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली भागात असलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिनी ही जवळपास आठवड्यापासून बंद आहे. त्यामुळे येथे येणऱ्या नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन तातडीने ती दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
शहरातील सर्वात मोठी व मध्यवर्ती भागातील ही स्मशानभूमी आहे. त्याशिवाय येथे डिझेल शवदाहिनीही उपलब्ध आहे. त्यामुळे शहराच्या भागातील बहुतांश नागरिक अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमीत येत असतात. मात्र, सुमारे आठवड्यापासून येथील डिझेल शवदाहिनी बंद असल्याने नागरिकांना लाकडावरच्या शवदाहिनीवरच अग्निसंस्कार करावे लागत आहेत. लाकडाच्या शवदाहिनीचे येथे चार स्टँड आहेत. मात्र, त्यावर अग्निसंस्कार करण्यासाठी लागणारा वेळ डिझेल शवदाहिनीच्या तुलनेत अधिक असतो. त्यामुळे याठिकाणी अग्निसंस्कारासाठी मृतदेह वेटिंगवर असतात. एकूणच नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन तातडीने त्याची दुरुस्ती करून डिझेल शवदाहिनी सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब सोनवणे यांनी कुळगाव बदलापूर नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले की, ही शवदाहिनी लवकर दुरुस्त करून सुरू करण्यात येईल.