बदलापूर : बदलापुरातील भुयारी गटार योजनेचे काम आणि त्यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान हे सर्वात चांगले आहे. मात्र त्या कामासाठी झालेला विलंब ही खेदाची बाब आहे. त्याला केवळ ठेकेदार नव्हे पालिका प्रशासनही जबाबदार आहे. परिस्थितीनुसार या योजनेत अनेक बदल करावे लागल्याने त्याचा खर्च वाढल्याचे मत माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी व्यक्त केले; तर भाजपाचे विद्यमान नगरसेवक या भुयारी गटार योजनेचे बिल अदा करण्यास विरोध करत आहेत.कुळगांव-बदलापूर नगरपालिकेची २०० कोटींची भुयारी गटार योजना ३०० कोटींवर गेलेली असतांनाही त्या योजनेचा कोणताच फायदा प्रत्यक्षात शहरवासीयांना झालेला नाही. शहरातील अनेक भागांतील जोडण्या भुयारी गटाराला न दिल्याने सर्व सांडपाणी थेट उल्हास नदीत जात आहे. ज्या भुयारी गटाराचे काम झाल्यावर नदीचे प्रदूषण कमी होईल, अशी अपेक्षा होती त्या भुयारी गटारातून पाणी मलनिस्सारण प्रकल्पापर्यंत पोहोचत नसल्याने या योजनेवर आक्षेप घेण्यात येत होते. तसेच या योजनेचे काम पूर्ण झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराला बिल देण्याची घाई पालिकेकडुन होत असल्याने त्यालाही काही नगरसेवकांनी अक्षेप घेतला आहे.भुयारी गटार योजनेचे काम करतांना संबंधित ठेकेदाराला वाढीव दराने बिल देण्याची मुभा दिल्याने त्या ठेकेदाराने वेळेत काम व्हावे यासाठी कोणतीच धडपड केली नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे. या सर्व प्रकरणावर चर्चा सुरु असताना ठेकेदाराला उर्वरित देऊ नये, अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांतर्फे करण्यात येत आहे. भाजपाने बिल देण्यास विरोध केलेला असतानाही पक्षाचेच माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी मात्र या योजनेचे समर्थन केले आहे. योजनेला विलंब हा केवळ ठेकेदारामुळे झालेला नाही. मलनिस्सारण प्रकल्पाची जागा ताब्यात न आल्याने ते काम रखडले होते.ती जागा मिळवून देण्याची जबाबदारी पालिकेची होती. मात्र त्याला विलंब झाल्याने योजनेचे काम पूर्ण होण्यास विलंब झाला. अनेक ठिकाणी पम्पिंग हाऊसची जागा तांत्रिक कारणास्तव बदलण्याची वेळ आली, योजनेसाठी कर्ज मिळण्यात विलंब झाला, तर काही काळ व्याजदर कमी करण्यासाठी गेल्याचा तपशील पातकर यांनी पुरवला. योजनेप्रमाणे ठेकेदाराने काम केलेले असेल तर त्याची पडताळणी करुन त्याला बिल देण्यास काही हरकत नसल्याचे मत त्यांनी मांडले.
भुयारी गटार योजनेच्या बिलावरुन भाजपात मतभेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 2:05 AM