ठाणे : आपल्या आयुष्यातील अनुभवांचे विविध टप्पे अत्रे कट्टयावर कवितांद्वारे उलगडण्यात आले. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळ आयोजित स्वरचित कवितांचा ‘गंध कवितेचे’ हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम पार पडला. जीवनात प्रत्येक गोष्टीला एक स्वत:चा रंग आहे. सुखाला जसा रंग आहे तसा दु:खालाही आहे. आशा-निराशा यांनाही रंग आहे. प्रेमाच्या विविधरंगी छटा आपल्याला दिसत असतात. तरी पण आपल्याला, माणसाच्या मनातील हळवा कप्पा अधिक भुलवतो. इतकंच नाही तर निसगार्ची विविध रुपे मानवी व्यक्तीमत्त्वाशी पुर्णतया भिनलेली असतात असे सांगत संगीता कुलकर्णी, प्रसाद भावे आणि स्नेहा शेडगे यांनी ही विविध रुपे आपल्या कवितांद्वारे उलगडली. भावे यांच्या ‘ना भेटी ना गाठी ना फुले ना गजरे’ या कवितेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर त्यांनी ‘आला पहिला पाऊस माझी आठवण काढ’, ‘आज माझे शत्रुही सलगी कराया लागले, काय असते ही अमिरी आता कळाया लागले’, ‘मी तुझा अन तु दुज्याची का असे सांगना’, ‘रंगुनी रंगात तुझीया जाहलो आता पुरा’, ‘आला पहिला पाऊस माझी आठवण काढ’ या कविता सादर केल्या. कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निमिर्ती करण्यात आली आहे. त्यांनी ‘मैत्री तुझी नि माझी’, ‘वळणावरच्या डवरलेल्या चाफ्याच्या झाडासारखी अचानक समोर येते’, ‘जगणं काय जगण्याचं स्वप्नसुद्धा पाहु शकत नाही तुझ्याशिवाय’, ‘मिहीत रात्र रंगली कमलपुष्पे फुलली, अबोल प्रित बोलली’, ‘रंग आहे पावसाचा अंग हे भिजणारच आहे’, ‘आयुष्य संदुर असतं, आठवणींना घेऊन बसावं कधी समुद्रकिनाऱ्यावर’ तर शेडगे यांनी ‘तेव्हाही मी आणि माझा देह असतो अलिप्त’, ‘अशीच हवी असते की स्वप्नातील ती?’, ‘मनमनाशी घालत असे सांगड अन सांजवेळी होत असे मनी हुरहुर’, ‘ओसाड रानांत नदीच्या गावात विहीरीने घेतलाय पाण्याचा धसका’ या कविता सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. शेवटी आजच्या कलयुगात प्रदुषण आणि प्लास्टीक हे दोन राक्षस असल्याचे सांगत भावे यांनी समाजप्रबोधन करणारे ‘ये प्लास्टीक की चीजे, वो बोतल ही ठहरी पोल्युटेड हवा’ हे विडंबन काव्य सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.