उल्हासनगर : नंदू ननावरे पतीपत्नीचा आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, खळबळ उडाली आहे. संग्राम निकाळजे यांच्यासह चौघांच्या त्रासाला कंटाळून पतीपत्नी आत्महत्या करीत असल्याचे व्हिडिओत ननावरे यांनी म्हटले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, तसेच मुलांना गावी आई-वडिलांकडे सोडून देण्याची विनंती व्हिडिओत केली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ आशेळेपाडा येथे राहणाऱ्या नंदू ननावरे यांनी पत्नीसह मंगळवारी दुपारी २ वाजता घराच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. माजी आमदार पप्पु कलानी व ज्योती कलानी यांचे खाजगी स्वीयसहायक म्हणून ननावरे यांनी काम केले. तसेच कलानी व शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचे मंत्रालयातील कामे ननावरे करीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ननावरे यांचे आमदार कार्यालयात येणे जाणे होते. मात्र अधिकृत खाजगी पीए नव्हता, अशी प्रतिक्रिया आमदार किणीकर यांनी यापूर्वी दिली आहे. दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी सम्राट निकाळजे यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हे दाखल केले आहे.
नंदू ननावरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीसह एक व्हिडीओ काढून जवळचे मित्र, नातेवाईक व पोलीस अधिकाऱ्यांना पाठविल्याची चर्चा होती. मात्र पोलिसांनी दुजोरा दिला नव्हता. तसेच ननावरे यांच्या खिश्यात सापडलेल्या चिट्टीवरून काहीएक उलघडा होत नसल्याची माहिती तपास अधिकारी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी देऊन, संग्राम निकाळजे यांच्यासह अन्य तिघावर गुन्हा दाखल केला. बुधवार रात्री पासून ननावरे पतीपत्नीचा आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओत नंदू ननावरे हे पत्नी उज्वलासह दिसत असून त्यांनी सम्राट निकाळजे व त्यांना मदत करणारे देशमुख नावाचे दोन वकील तसेच रणजितसिंग नाईक निंबाळकर या चौघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
चौघावर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी
आमच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या चौघावर गुन्हे दाखल करून, कारवाई करण्याची विनंती ननावरे दाम्पत्यानी व्हिडीओ केला. तसेच स्थानिक देशमुख वकीलाने घरात रेकी करून, संग्राम निकाळजे अंबरनाथच्या राजकीय नेत्यांना भेटल्याचा उल्लेख केला. तसेच रणजितसिंग नाईक निंबाळकर यांचाही उल्लेख व्हिडिओत केला. तेंव्हा माढाचे खासदार निंबाळकर यांनी तो मी नाही. माझ्या नावाची ११ जण फलटण शहरात राहत असल्याची माहिती निंबाळकर यांनी सोशल मीडियावर दिली आहे.