ठाणे: खरा गुरू व अंधश्रद्धा पसरविणारे गुरू यांतील फरक मी नेहमी विद्यार्थ्यांना समजावून सांगत असते. पुर्वीच्या काळी आणि आजही गुरू होणं कठिण आहे. गुरूने दिलेल्या ज्ञानाचे नुसतं प्रवचन देऊन त्यातून गुरूंना समाधान मिळणार नाही तर जेव्हा त्या ज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोजन केले जाईल त्यावेळी गुरूंना समाधान मिळेल असे प्रतिपादन डॉ. शारदा निवाते यांनी केले. अत्रे कट्ट्यावर गुरूपौर्णिमेनिमित्त ‘गुरू’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी डॉ. निवाते यांनी आपल्या व्याख्यानातून गुरूंची महती सांगितली. त्या म्हणाल्या की, अज्ञानाचा अंधकार दूर करुन ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा, सुचक, वाचक, प्रेरणादायी, दर्शक, बोधक, शिक्षक हे गुरू आहेत. आपल्याकडे गुरूशिष्य परंपरा आहे. प्राचीन काळात श्रेष्ठ दर्जाचे गुरूकुल होते आणि तेथून श्रेष्ठ दर्जाचे ज्ञानही मिळत होते. गुरू म्हणजे ज्ञान. जे खरे मार्गदर्शन करतात तेच गुरू आणि त्यांच्यासमोरच नतमस्तक व्हावे हे मुलांना सांगण्याची गरज आहे. मनापासून केलेला , साश्रुनयनांनी केलेला नमस्कार म्हणजे त्या माणसांतील गुण आपल्यात संक्रमीत करतो. आपण जन्माला येतो तेव्हा आपला पहिला गुरू ही आपली आई असते, परमेवराला वेळ नव्हता म्हणून त्याने आईची निमिर्ती केली अश्ी कवी कल्पना आहे असे सांगत त्यांनी ‘आई हे देवाचे रुप...’ ही कविता सादर केली. अतिसज्जन बनण्याचा प्रयत्न केल्यास तो नक्कीच अंगाशी येतो. वास्तव हे आपण स्वीकारलेच पाहिजे हे आम्ही मुलांना सांगत असतो. शिष्य देखील गुरूंची परिक्षा घेत असतात हे सांगणारी एक कथा त्यांनी उपस्थितांना ऐकविली. प्रात्यक्षिकांचे ज्ञान जे शिकवतील त्यांनाच आपण गुरू बोलूया आणि त्यांनाच वंदन करु या असे आवाहनही त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून केले. कट्टयाच्या अध्यक्षा शीला वागळे यांनी त्यांची सुरुवातीला ओळख करुन दिली. शेवटी कट्ट्याच्या संस्थापिका संपदा वागळे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.------------------------------फोटो : अत्रे कट्टा