डोंबिवली: एमआयडीसीमधील घरडा सर्कल ते कल्याण शीळ महामार्गाच्या प्रवेशद्वारापर्यंत मुख्य रस्त्याचे काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. शहरातील अन्य रस्त्यांपेक्षा तुलनेने चांगले डांबरीकरण झाल्याने नागरिकांमध्ये त्याबद्दल समाधान होते, मात्र गेल्या आठवड्यात केबल टाकण्याच्या कारणाने तेथील रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. त्या ठिकाणी परत पॅचवर्क न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.शहरात सर्वत्र ओबडधोबड रस्ते, पॅचवर्क झाले असल्याने आधीच वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. त्यातच बहुतांशी ठिकाणी सीसी रोडवरही रिकास्टींग करण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात तुलनेने चांगला असलेला एमआयडीसीच्या कार्यालयासमोरील रस्ता चांगला करण्यात आला होता. मात्र या रस्त्यावरही विविध कारणाने खोदकाम करण्यात आले असून केबल्स टाकण्यात आल्या आहेत. मात्र पुन्हा त्या ठिकाणी पॅचवर्क केलेले नाही. ते कधी करणार? आणि खोदकाम केल्यावर काम झाल्यानंतर तातडीने ते का करण्यात आलेले नाही? या खोदकामाचे पैसे संबंधित ठेकेदाराने एमआयडीसीला भरले होते का? असे प्रश्न परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केले आहेत. तसेच जेव्हा डांबरीकरण करण्यात आले होते, त्याचवेळी खोदकाम का केले नाही? त्याच त्याच कामांसाठी किती वेळा बिले काढायची असा सवालही दक्ष नागरिकांनी केला. ठेकेदाराच्या कामगारांना याबाबत काहीही माहिती नसून जशा सूचना आल्या त्या पद्धतीने काम करत असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्या ठिकाणी पुन्हा डांबरीकरणाचे पॅचवर्क कधी केले जाणार या बाबतही कामगारांना काहीही माहिती नव्हते.
डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा खोदकाम; नागरिकांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:07 AM