ठाणे - ठाणे महापालिकेच्या देशातील पहिल्या डिजी सिटी अॅपचा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शुभारंभ झाला. आतापर्यंत २२ लाख ठाणेकरांपैकी पाच लाखांचे टार्गेट अपेक्षित होते. परंतु, केवळ ४२ हजार नागरिकांनीच ते डाउनलोड केले आहे. त्यातही या अॅपद्वारे मालमत्ताकराचा भरणा केल्यास दोन टक्के सवलत दिली जाईल, असे पालिकेने जाहीर केले होते. परंतु, यामध्ये केवळ २०० नागरिकांनीच मालमत्ताकर भरला आहे. असे असतानासुद्धा संबंधित संस्थेला पालिकेने आतापर्यंत ११ कोटींचे बिल अदा केले असल्याची माहिती उघड झाली.यामुळे पालिकेचे दिवाळे काढणाऱ्या या डिजी अॅपवर मेहरबानी दाखवण्याचे गौडबंगाल काय, ते राबवणाºया फॉक्सबेरी कंपनीचे मंत्रालय कनेक्शनचे काय लागेबांधे आहेत, याची चौकशी झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येऊन ११ कोटींची ‘बेरी’ नेमकी कोणत्या ‘फॉक्स’ अर्थात कोल्ह्यांनी खाल्ली, हे उघड होण्याची शक्यता आहे.महापालिकेने देशातील पहिल्या डिजी अॅपचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी झाला. त्यानंतर, आतापर्यंत ते २२ लाख ठाणेकरांपैकी केवळ ४२ हजारांनीच डाउनलोड केले आहे, तर ४०० च्या आसपास व्यापारी या अॅपशी कनेक्ट झाले आहेत. तसेच त्याच्या माध्यमातून पालिकेचा मालमत्ताकर भरणा सुरू झाला आहे. परंतु, उर्वरित कर भरण्याच्या सुविधा मात्र अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. हे अॅप चालवणाºयांच्या म्हणण्यानुसार ठाणेकर करदात्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, केवळ २०० मालमत्ताधारकांनीच आतापर्यंत या योजनांचा लाभ घेतला आहे.महापालिका या अॅपच्या जनजागृतीमध्ये कमी पडल्याचे आजही दिसत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ते सुरू झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंत किमान पाच लाखांच्या आसपास नागरिकांनी ते डाउनलोड करणे अपेक्षित होते. परंतु, तसे काही झालेले नाही. यामुळे महापालिकेने यापूर्वी विविध योजना यशस्वी करण्यासाठी जो फंडा वापरला, तोच आतादेखील वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, डिजी सिटीच्या माध्यमातून मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका शिबिराचेही आयोजन केले होते.दिवाळीनंतर वाद पेटण्याची शक्यतायापूर्वीसुद्धा विविध माध्यमांतून हे अॅप जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु, त्यात पालिकेला अपयशच आल्याचे दिसून आले आहे.असे असताना आणि लक्ष्य साध्य झाले नसतानासुद्धा पालिकेने या संस्थेला आतापर्यंत ११ कोटींची देणी दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.त्यामुळे यावरून येत्या दिवाळीनंतर वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डिजी अॅपला ११ कोटींची बिदागी, मलिदा लाटणारे ‘कोल्हे’ कोण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 2:54 AM