उल्हासनगर : नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महापालिकेने कमला नेहरूनगर येथे बांधलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उदघाटन महाराष्ट दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते डिजिटल स्वरूपात झाले. यावेळी आमदार कुमार आयलानी, आयुक्त अजीज शेख यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिकेने कोरोना काळात शहरवासीयांसाठी उभारलेले २०० बेडचे रिजेन्सी अंटेलिया येथील रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडले. तर दुसरीकडे कॅम्प नं-१ कमला नेहरूनगर येथे उभारलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते डिजिटल स्वरूपात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सकाळी साडे ११ वाजता झाले. यावेळी आमदार कुमार आयलानी, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोकनाईकवाडे, सुभाष जाधव, शहर अभियंता प्रशांत साळुंके, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, अग्निशमन अधिकारी बाळू नेटके आदीजन उपस्थित होते.
शहरातील कमला नेहरूनगर, टिळकनगर येथे उभारलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात मोफत आरोग्य उपचार व औषधे देण्यात येणार आहे. तसेच ३० प्रकारच्या विविध चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती वैधकीय अधिकारी डॉ अनिता सफकाळे यांनी दिली. कॅम्प नं-१ परिसरातील हजारो नागरिकांनी या दवाखान्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी केले. कार्यक्रमाला विविध पक्षाच्या नेते व पदाधिकार्यांनी हजेरी लावली होती.