भिवंडी : भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी या रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यावर माल वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनांकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली करण्यात येते, मात्र रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे टोल वसूल करणाऱ्या कंपनीचे पुरता दुर्लक्ष झाले आहे.
मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.ठिकठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाल्याने कंपनीने थातूर मातूर पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती केली जाते मात्र काही दिवसांनी पुन्हा हा रस्ता नादुरुस्त होत असल्याने या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असून अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
या रस्त्याच्या कंत्राटदारांकडू बहात्तर गाळा ते महेश कॉरी दरम्यान रस्त्याची डागडुजी केली आहे.मात्र हि दुरुस्ती करतांना गुणवत्तापूर्वक केली नसल्याने येथे दुचाकी स्वारांना प्रचंड त्रास होत आहे.अंजुरफाटा चौकात देखील रस्ता खराब झाला असून खारबाव पुलाजवळ रस्तावर प्रचंड खड्डे पडले आहेत.तर खारबावच्या पुढे चिंचोटी पर्यंत य रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे जीवघेणे झाले आहे.
एकीकडे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात भिवंडी वाडा मनोर रस्त्याच्या ठेकेदाराची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून ठेकेदाराची एसआयटी चौकशी होणार आहे.मात्र दुसरीकडे भिवंडीतील मानकोली अंजुर फाटा चिंचोटी या रस्त्याकडे राज्य शासनासह टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने या मार्गाची देखील एसआयटी चौकशी करण्यात यावी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.