उल्हासनगर : रस्त्याची पुनर्बांधणी व भुयारी गटार पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गुरुवारी या रस्त्याच्या खड्डयात महापालिकेची अडकलेली अग्निशमन दलाची गाडी जेसीबी मशिनद्वारे काढावी लागल्याने, महापालिका कामकाजावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.
उल्हासनगरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू असून दुसरीकडे १५० कोटीच्या एमएमआरडीएच्या निधीतून ७ मुख्य रस्त्याची पुनर्बांधणी होत आहे. गटारीचे पाईप टाकण्यासाठी व रस्ता पुनर्बांधणीसाठी अनेक रस्ते खोदण्यात आले. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश आयुक्त अजीज शेख यांनी देऊनही, खोदलेल्या रस्त्याची दुरावस्था कायम आहे. या खोदलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता राजकीय पक्षाचे नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. मात्र त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप सर्वस्तरातून होत आहे. गुरुवारी संततधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र असून शहर पूर्वेत एक झाड कोसळल्याने, ते बाजूला करून महापालिकेची अग्निशमन दलाची गाडी भाटीया चौक ते स्मशानभूमी मार्गाने मुख्यालयकडे जात होती. त्यावेळी गाडी खोदलेल्या रस्त्याच्या खड्डयात अडकली. अखेर खड्यातून गाडी बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन बोलवावी लागली.
महापालिकेची अग्निशमन दलाची गाडी खोदलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात अडकल्याने, ती गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन बोलविण्याची नामुष्की ओढविली. भाटीया चौक ते गाऊन मार्केट, स्मशानभूमी रस्ता, गायकवाड पाडा रस्ता, डॉल्फिन रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी रस्ता, कुर्ला कॅम्प रस्ता यासह खोदलेले अनेक अंतर्गत रस्त्याची दुरावस्था आजही कायम आहे. पावसाळ्यात या खोदलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात पाणी साचून दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. मोठी दुर्घटना घडण्यापुर्वी खोदलेले रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.
रस्त्याची दुरुस्तीचे आदेश
शहरात ४२३ कोटींची भुयारी गटार योजना, १२६ कोटींची पाणी पुरवठा योजना, एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याची पुनर्बांधणी, शासनाच्या १४५ कोटीच्या मूलभूत सुविधा निधीतील विविध कामे शहरात सुरू आहेत. हे।कामे पूर्ण करण्यासाठी रस्ते खोदावे लागले. मात्र खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरू आहेत.