लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहर व ग्रामीण भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असून शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.भिवंडी ठाणे मार्गावर नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.दररोज होणाऱ्या या वाहतूक कोंडीला पर्यायी रस्ता म्हणून काल्हेर ते ताडली- भादवड पाईपलाईन रस्त्याने नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात.मात्र या पाईपलाईन रस्त्यावर सध्या प्रचंड खड्डे पडले असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
काल्हेर ते ताडाळी या पाईपलाईन रस्त्याची मे महिन्याच्या अखेरीस बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र निकृष्ट केलेल्या या दुरुस्ती मुळे पावसाळ्यात या रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. भिवंडी व ठाणे प्रवास करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या पाईपलाईन रस्त्याचा वापर करीत असून पुन्हा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने वाहन चालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आपण नेहमीच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून व पत्रव्यवहार करून या रस्त्याच्या दुरावस्थेची व्यथा मांडत आलो आहोत,आता गणेशोत्सव सण तोंडावर आला असल्याने गणेशोत्सवानिमित्त तरी या संपूर्ण रस्त्यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेने दुरुस्ती करावी अशी मागणी गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांनी केली आहे.