ठाणे : फातिमा जाफरची एक विकेट आणि नाबाद २१ धावांची खेळी दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाच्या अर्जुन मढवी स्मृती महिला टी ट्वेन्टी क्रिकेट लीग स्पर्धेमधील पहिल्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेतील सामन्यात दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा सात विकेट्सनी दणदणीत पराभव केला.
दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजावर अंकुश ठेवला होता. पण त्याचवेळी त्यांनी दिलेल्या २१ अवांतर धावामुळे पय्याडे स्पोर्ट्स क्लबच्या खात्यात ५ बाद ७५ धावा जमा झाल्या. त्यांच्या आश्लेषा बराईने १८, रुही आधारकरने १६ आणि आयुषी सिंगने ७५ धावा केल्या.
रेश्मा नायक, समृद्धी राऊळ आणि फातिमा जाफरने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने विजयाचे आव्हान ९ व्या षटकात तीन फलंदाजांच्या मोबदल्यात ७७ धावा करत पूर्ण केले. शाहीन अब्दुल्लाने १९ चेंडूत सात चौकार मारत ३२ धावा केल्या. फातिमा जाफरने तडाखेबंद नाबाद २१ धावा करताना १३ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार मारला. फातीमाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. संक्षिप्त धावफलक : पय्याडे स्पोर्ट्स क्लब : २० षटकात ५ बाद ७५, अवांतर २१ ( आश्लेषा बराई १८, रुही आधारकर १६, आयुषी सिंग १३, रेश्मा नायक ४-१-१०-१, समृद्धी राऊळ ४-१-१७-१, फातिमा जाफर ३-०-१०-१) पराभूत विरूद्ध दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन : ९ षटकात ३ बाद ७७ (शाहीन अब्दुल्ला ३२, फातिमा जाफर नाबाद २१, रिद्धी ठक्कर ४-३३-१, अक्षरा पिल्लई ३-१०-१) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ; फातिमा जाफर.