- राजू काळे
भार्इंदर, दि. २८ - नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौर पदावर तर उपमहापौर पदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी दोन्ही पदांसाठी अनुक्रमे सेना, काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरल्याने त्यांनी माघार न घेतल्याने ते एकत्र आले. त्यामुळे निवड बिनविरोध न होता निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
यंदाच्या निवडणुकीत सेनेने एकहाती सत्तेच्या दिशेने केलेल्या प्रचारात महत्वांच्या निर्णयांत चूक करुन स्थानिक उमेदवारांच्या जागा बदलल्याने अपेक्षित जागांच्या समीकरणाला चांगलाच फटका बसल्याची चर्चा पक्षातच सुरु झाली आहे. यामुळे सेनेच्या जागा २२ वर स्थिरावल्या. तसेच काँग्रेसला प्रभाग २० मधील चारही जागा अपेक्षित असताना एका बिनविरोध जागेखेरीज उर्वरीत तीन जागा भाजपाच्या मनी आणि मुनीमुळे गमवाव्या लागल्या. यामुळे काँग्रेसच्या १६ ते २० जागांचे समीकरण कोलमडुन पडले. काँग्रेस पुरस्कृत दोन अपक्षांसह पक्षाला एकूण १२ जागा मिळाल्या. बहुमताचा गड भाजपाने सर करुन ६१ जागा पटकावल्या. यामुळे उर्वरीत ३४ जागांमध्ये सेना, काँग्रेस व अपक्षांचे गणित बसले. पालिका निवडणुक पार पडल्यानंतर सोमवारी भाजपाने महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या वेळी एकहाती सत्ता स्थापना करुन अल्पमतातील सेना, काँग्रेसला त्यांच्या हातातील तलवार म्यान करण्यास लावली. महापौर पदासाठी सेनेच्या अनिता पाटील यांनी तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी सेना व काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेता एकत्रपणे आपापल्या उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय घेतला. महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक बिनविरोध न होता ती निवडणुकीद्वारे पार पडली. सेना, काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी ३४ तर भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ६१ मते पडल्याने भाजपाच्या डिंपल मेहता महापौर तर चंद्रकांत वैती उपमहापौर पदावर विराजमान झाल्याचे पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहिर केले. त्यांना सहकार्य करण्यासाठी उपजिल्हा दंडाधिकारी परदेशी तसेच पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते हे देखील सभागृहात उपस्थित होते.
शिवसेना, काँग्रेस एकत्रित विरोध पक्षाची भूमिका पार पाडणार ..
यंदाच्या पालिका निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी अपेक्षिलेली युती दुंभगली. त्यामुळे अल्पमतात असलेल्या सेना, काँग्रेसने सत्ता नाही तर विरोधी बाकावर मात्र एकत्रितपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावुन भाजपाला विरोध करणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक अनिल सावंत यांनी स्पष्ट केले.
पालिका निवडणुकीत सेनेने निष्ठावंतांना डावलुन नाराजी ओढवुन घेतली. त्यातच काही महत्वांच्या प्रभागांत चुकीचे निर्णय घेतले. त्याची किंमत सेनेला मोजावी लागली. निष्ठावंताच्या नाराजीमुळे अनेक प्रभागांत भाजपाने मुसंडी मारुन काही निष्ठावंतांच्याच असहकार्याचा फटका सेनेला बसला. त्यामुळे एकहाती सत्तेचे स्वप्न दुभंगले तरी पक्षाच्या जागा मात्र ५० टक्यांहुन अधिक वाढल्याचे समाधान नेत्यांकडुन व्यक्त केले जात असले तरी काही कट्टर सैनिकांकडुन मात्र त्यावर खंत व्यक्त केली जात आहे. मनी व मुनींच्या प्रचाराने भाजपाला तारल्याचे आरोप केले जात असले तरी गुजराती, मारवाडी समाजाचे प्राबल्य नसलेल्या प्रभागांतही भाजपाने मुसंडी मारल्याचे सेनेने विसरु नये, असा टोला माजी नगरसेवक आसिफ शेख यांनी सेनेला लगावला. सेनेसमोर सध्या विरोधी बाकावर बसुन काँग्रेससोबत विरोधी पक्षाची भुमिका निभावण्याचाच पर्याय उपलब्ध असला तरी त्याला सेनेऐवजी काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
- भाजपाच्या प्रभाग १ मधील नगरसेविका रिटा शाह या रुग्णालयात दाखल असताना थेट रुग्णालयातुन त्या महापौर व उपमहापौर निवडणुकीला हजर राहिल्या. काँग्रेसखेरीज सेना व भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान केले होते. तर भाजपाने फेट्याच्या दर्शनी भागी कमळाचे चिन्ह लावले होते. महापौर व उपमहापौर जाहिर होताच पालिका मुख्यालयाच्या आवारात ढोल -ताशे व बॅण्ड व वाजविण्यात आले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. मुख्यालयात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाल्याने भाजपा आ. नरेंद्र मेहता यांना पोलिसांच्या गराड्यात मुख्यालयाबाहेर काढण्यात आले. महापौर व उपमहापौरांची निवड जाहिर होताच आ. संजय केळकर यांनी आ. मेहता यांना पेढा भरवुन त्यांचे अभिनंदन केले.