ठाणे : हॉटेल सायंकाळी सातनंतर बंद करण्याच्या आदेशामुळे हॉटेल व्यावसायिकांमधून संताप व्यक्त केला जात असताना खवय्यांनीही ते उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. हॉटेल किंवा अन्य खाद्यपदार्थांच्या दुकानांत जाण्यासाठी संध्याकाळीच खवय्ये बाहेर पडतात. त्यामुळे सायंकाळी सातनंतरही हॉटेल्स सुरू ठेवण्याची मागणी ठाण्यातील खवय्यांनी केली आहे.शासनाने सोमवारपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याचे आदेश दिले. या वेळेला हॉटेल व्यावसायिकांनी विरोध केला आहे. हॉटेलचा मुख्यत्वे व्यवसाय हा सायंकाळी असतो. त्यामुळे सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी सोमवारी महापालिका प्रशासनाला केली. त्यांच्या या मागणीला ठाण्यातील खवय्यांनीपण दुजोरा दिला आहे. दिवसभर काम केल्यावर सायंकाळच्या वेळेसच ठाणेकर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा इतर खाद्यपदार्थांच्या दुकानांत खाण्यासाठी बाहेर पडू शकतात आणि सायंकाळी सातनंतरच कोरोनाचा प्रसार होतो का, असा सवाल त्यांनी केला आहे.हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी प्रत्येक महापालिकेचे नियम वेगळे आहेत. या नियमांमध्ये सुसूत्रता नाही. वेळेची मर्यादा घालून व्यावसायिकांची अडवणूक करण्याचा पालिकेचा बेत आहे की काय, असे वाटत आहे. लोकांच्या गरजेचा विचार केला जात नाही.- मकरंद जोशीहॉटेल किंवा अन्य खाद्यपदार्थांची दुकाने नुसती सुरू करू देण्यात काही अर्थ नाही. खाद्यप्रेमी हे संध्याकाळीच स्नॅक्स कॉर्नर किंवा हॉटेलात जातात. यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत आस्थापना उघडी ठेवण्याची गरज आहे.- अजय नाईकतब्बल सहा महिन्यांनंतर हॉटेल्स सुरू झाले आहेत. पण हॉटेल्स, रेस्टॉरंट्स चालू ठेवण्याच्या वेळेत मर्यादा आहेत. ज्यांना कामाच्या गडबडीत त्या वेळेत जाणे शक्य होत नसेल त्यांनी काय करावे? वेळेच्या बाबतीत विचार जरूर व्हायला हवा.- अस्मिता येंडे
हॉटेल सायंकाळी सुरू ठेवण्याची खवय्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 12:33 AM