मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक दिनेश जैन विजयी झाले . शिवसेनेच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करणाऱ्या भाजपा व दिनेश जैन यांचा निषेध करत सभात्याग केला . महाराजांच्या पुतळ्यास विरोध करण्याचा ठराव मांडला म्हणून भाजपने दिने याना सभापती पदाची दिलेली बक्षिसी असल्याचो टीका सेनेने केली . तर मेहता विरोधी गटातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज एकमेकांना सूचक - अनुमोदक राहिल्याने बाद ठरले .
मीरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपातील मेहता समर्थक दिनेश जैन तर मेहता विरोधक गटातील राकेश शाह व सुरेश खंडेलवाल यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आले होते . दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने कमलेश भोईर यांनी अर्ज भरला . भाजपा कडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापती भाजपचा होणार हे स्पष्ट होते .
तर स्थायी समितीच्या बैठकीत दिनेश जैन व भाजपा नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३० फूट पुतळा बनवण्याच्या कामास विरोध करत प्रशासनाचा प्रस्ताव बैठकीत फेटाळून लावल्याने भाजपावर टीकेची झोड उठली आहे . विविध स्तरातून दिनेश जैन व भाजपाचा निषेध होत आहे . आजच्या सभापतो पदाच्या निवडणुकीत देखील शिवसेना नगरसेवकांनी दिनेश जैन व भाजपाचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध करणाऱ्याच्या विरोधात देखील मतदान न करता आमचा संताप व्यक्त केल्याचे सेनेच्या नगरसेवकांनी बोलून दाखवले .
परंतु शाह व खंडेलवाल हे दोनही उमेदवार असताना त्यांनी एकमेकांना सूचक व अनुमोदक दिले असल्याने आज बुधवारी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली त्यावेळी नियमा प्रमाणे त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले . दरम्यान शिवसेनेने सभात्याग केल्याने भाजपाचे दिनेश जैन यांना अपेक्षे प्रमाणे भाजपाची १० मते मिळाली तर काँग्रेसचे २ नगरसेवक तटस्थ राहिले .
दिनेश जैन यांच्या विजया नंतर मेहता समर्थकांनी पालिकेत व महापौर दालनात एकच जल्लोष केला . महापौर ज्योत्सना हसनाळे , उपमहापौर हसमुख गेहलोत आदी पदाधिकाऱ्यांसह नरेंद्र मेहता , मेहता समर्थक नगरसेवक , पदाधिकारी आदींनी नवनिर्वाचित सभापती दिनेश जैन यांचे अभिनंदन केले . मेहता समर्थकांनी दिनेश यांचा विजय हा मेहतां मुळे झाल्याचे सांगत विरोधकांना त्यांची जागा मेहतांनी दाखवून दिल्याचे म्हटले . निवडणुकी आधी मेहता समर्थक स्थायी समिती सदस्यांना वरसावे येथील मेहतांच्या सी एन रॉक हॉटेल मध्ये ठेवले होते असे सूत्रांनी सांगितले .
कोरोना संसर्ग नियमांना हरताळ यावेळी कोरोना संसर्गाचे नियम पालिका मुख्यालयातच पायदळी तुडवण्यात आले . सोशल डिस्टेनसिंग पुरते धाब्यावर बावलेच शिवाय महापौर., मेहतां सह बहुतांशी नगरसेवक , पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयातच मास्क सुद्धा घातले नव्हते .