- पंकज पाटीलअंबरनाथ - अंबरनाथमधील सर्व आॅटो रिक्षा सीएनजी झाल्या असून या रिक्षा चालकांनी शासकीय नियमांची पायमल्ली करून परस्पर रिक्षा भाडेवाढ केली आहे. ही भाववाढ ५-१० टक्के नसून थेट ५० टक्के भाववाढ केली आहे. रिक्षा स्टँडवर लहानसा फलक लावून ही दरवाढ जाहीर केली असून प्रवाशांवर ती लादण्यात आली आहे. या भाववाढीबाबत प्रादेशिक परिवहन विभाग आणि स्थानिक वाहतूक विभागाचे अधिकारीदेखील कोणतीच कारवाई करीत नाहीत.अंबरनाथमधील रिक्षा चालकांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. रिक्षा भाडेवाढ करण्याचा कोणताचा अधिकार हा रिक्षा चालकांना किंवा त्यांच्या संघटनांना नाही. असे असतानाही बदलापूरप्रमाणे अंबरनाथमधील काही रिक्षा संघटनांनी परस्पर रिक्षा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आणि लागलीच त्यांची अंमलबजावणीदेखील केली. अंबरनाथमधील बहुसंख्य रिक्षा ह्या शेअर सिटवर चालविण्यात येतात. विशेष म्हणजे, स्टँडवरील रिक्षा चालकांनी कधीही नियमाप्रमाणे तीन सीट भरलेले नाहीत. पाच सिट भरत नाहीत तोवर स्टँडवरून रिक्षा काढली जात नाही. त्यामुळे स्टँडवर लांबच लांब रांगा लागतात. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे केवळ तीन सिट घेण्याचे आदेश आहेत. मात्र त्याच आदेशाला बगल देण्याचे काम रिक्षा चालक करीत आहेत. त्यातच अंबरनाथ बी केबीन रोडवरील साईनाथ रिक्षा चालक मालक संघटनेने आपल्या फलकावर एक सूचना प्रसिद्ध करून रिक्षाची ५० टक्के भाडेवाढ केली आहे.अंबरनाथमधील नोंदणीकृत रिक्षा संघटनांना विश्वासात न घेता ही भाडेवाढ केल्याचे समोर येत आहे. मुळात भाडेवाढीसंदर्भातील प्रस्ताव हा प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रलंबित आहे. त्या भाडेवाढीवर अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र रिक्षांची देखभाल दुरुस्ती, इंधनाचे वाढते दर आणि रिक्षाच्या पार्टचे वाढलेले दर याचे कारण पुढे करून ही दरवाढ करण्यात आलेली आहे. मात्र या दरवाढीला कायदेशीर मान्यता नाही. रिक्षा संघटनांनी परस्पर निर्णय घेत ही भाडेवाढ केली आहे. त्यामुळे ही भाडेवाढ म्हणजे प्रवाशांवर लादलेली दादागिरी असल्याचे समोर आले आहे. या दरवाढीमुळे प्रवासी आणि रिक्षा चालक यांच्यातही मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. मात्र संघटनेचा निर्णय झाल्याचे कारण पुढे करून रिक्षा चालकही जबरदस्तीने प्रवाशांकडून वाढीव पैसे घेत आहेत.यासंदर्भात अंबरनाथ वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी भाडेवाढीसंदर्भात आपल्यापर्यंत कोणतीच तक्रार आलेली नाही, असे कारण पुढे करत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र परस्पर भाडेवाढ करता येत नाही हे सांगून रिक्षा संघटनांनाही आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे. तर दुसरीकडे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आपल्या निर्णयावर ठाम असून भाडेवाढ करताना प्रत्येक रिक्षा चालकाला केवळ तीन सिट भरण्याची सक्ती केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या सक्तीमुळे सर्व रिक्षा चालकांना व्यवसाय मिळण्यास मदत होईल, असेही स्पष्ट केले. दरम्यान, ही बेकायदेशीर भाडेवाढ रद्द करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जातआहे.दोन - अडीच किमीसाठी १५ रुपयेबी केबीन रोडवरील स्टँडवरून सुटणारी रिक्षा नवरेनगर आणि हरिओम पार्कपर्यंत जाण्यासाठी शेअर भाडे म्हणून १० रुपये आकारण्यात येत होते. आता हाच दर थेट १५ रुपये करण्यात आला आहे. नवरेनगर, हरिओम पार्क आणि ग्रीन सिटीपर्यंत जाण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला आता १० रुपयांऐवजी थेट १५ रुपये मोजावे लागणार आहेत. एखाद्या प्रवाशाने थेट रिक्षा नेल्यास त्याला ४५ रुपये मोजावे लागणार आहेत. मुळात नवरेनगरपर्यंतचे अंतर हे अवघे दोन ते अडीच किलोमीटरचे आहे. एवढ्या लहान अंतरासाठीदेखील प्रवाशांकडून थेट ५० टक्के भाडेवाढ आकारण्यात येत आहे.रिक्षा संघटनेने बैठक घेऊन भाडेवाढीचा निर्णय घेतला. भाडेवाढ केली तरी चालकांना केवळ तीन सीट नेण्याची बंदी घातली आहे. चौथी सीट घेतल्यास वाढीव भाडे आकारता येणार नाही. सुरक्षेच्या हेतूने हे योग्य आहे. नियम मोडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल.- निवृत्ती कुचिक, कार्याध्यक्ष, जोशी काका रिक्षा चालक मालक संघटना
थेट ५० टक्के रिक्षा भाडेवाढ, अंबरनाथमधील रिक्षाचालकांचा परस्पर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 3:19 AM