अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून ठाणे लोकसभेत २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना अशीच होणार आहे. या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा स्व. आनंद दिघे यांच्या अवतीभवती फिरणार असल्याचे दिसत आहे. ठाण्याचा गड कोण राखणार, दिघेंचा कोणता शिष्य दिल्लीत जाणार, याचे औत्सुक्य आहे.
ठाणे लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवृत्त वैद्यकीय अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने तिरंगी लढतीची निर्माण झालेली शक्यता मावळली. आता ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच लढत या मतदारसंघात होणार आहे. म्हस्के किंवा विचारे हे दोघेही स्व. दिघे यांच्या तालमीत तयार झाले. दिघे यांच्या शब्दाला दोघांकडून सन्मान दिला जात होता. मतदानाची तारीख जवळ येत जाईल तसा निवडणुकीचा प्रचार हा अधिक वैयक्तिक पातळीवरील टीकेपर्यंत जाईल, असे संकेत परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपाने दिले आहेत. दोन्ही उमेदवारांकडून दिघे कार्ड खेळले जाणार असून निष्ठावंत व गद्दार याच मुद्द्याभोवती निवडणूक घुटमळेल, असे दिसते. ठाणे जिल्हा हा धर्मवीरांचा बालेकिल्ला होता. त्यानंतर हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले. आजतागायत ठाण्याचा गड शिंदे यांच्याकडून कुणालाही खेचून घेता आलेला नाही.
दोन वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्याचा बालेकिल्ला महत्वाचा मानला जात आहे. ठाकरे यांना ठाण्यानेच पहिली सत्ता दिली होती. मागील २५ वर्षे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा अबाधित ठेवण्यात शिवसेनेला यश आले. आतापर्यंत ठाण्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस लढत झाली. यावेळी प्रथमच दोन शिवसेनेत लढत होत आहे. येत्या १२ मे रोजी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची म्हस्के यांच्यासाठी सभा आयोजित केली आहे. राज यांच्या सभेचा म्हस्के यांना कसा व किती फायदा होतो ते निकालानंतर समजेल.
ठाण्यातील भाजप व रा. स्व. संघाची मते ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरिता दिली जातील, असे भाजपचे नेते सांगतात. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेला कळवा, मुंब्रा-दिवा परिसर कल्याण मतदारसंघात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांचा ठाण्यात प्रभाव नाही. ठाणे शहरातील शिवसेनेची मते कशी पडतात त्यावरच उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.