डोंबिवली: कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवलीतील ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात साचलेल्या कच-याकडे आणि घाणीच्या साम्राज्याकडे लक्ष वेधूनही त्याकडे होत असलेल्या दुर्लक्ष होत असल्याचा निषेध म्हणून सोमवारी केडीएमसीच्या विभागीय कार्यालयात मनविसेच्या वतीने मैदानी खेळ खेळून अनोखे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी फ प्रभाग अधिकारी तथा मालमत्ता विभागाची अतिरिक्त जबाबदारी असलेल्या अमित पंडीत यांना निवेदन देण्यात आले. दुरवस्थेची दखल न घेतल्यास मनसे आपल्या पध्दतीने आंदोलन छेडेल आणि लग्न समारंभाला ऐनवेळी दिलेल्या तारखा रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर येईल असा इशारा मनविसेचे डोंबिवली शहरअध्यक्ष सागर जेधे यांच्यावतीने देण्यात आला. क्रिडासंकुलात पार पडणा-या लग्न समारंभामुळे सद्यस्थितीला कच-याचे साम्राज्य पसरले आहे. काही दिवसांपुर्वीच याकडे लक्ष वेधत मनविसेचे जेधे यांनी 24 तासात क्रीडासंकुलातील कचरा न उचलल्यास महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी वेलरासू यांना हाच कचरा पाठवून देऊ असा इशारा दिला होता. क्रिडासंकुल हे डोंबिवलीकरांसाठी एकमेव मोठे मैदान आहे. या ठिकाणी सकाळ व सायंकाळच्या सुमारास ज्येष्ठ नागरीक चालण्या-फिरण्यासाठी येत असतात. परंतू हे मैदान उत्सव आणि लग्न सोहळयांसाठी भाडयावर दिले जात असल्याने खेळाडुंच्या खेळास आणि नागरीकांच्या फिरण्याला बंधन येत आहेत. दरम्यान गेल्या सोमवारी याठिकाणी पार पडलेल्या लग्न सोहळयामुळे कचरा जमा झाला होता. तो उचलला न गेल्याने दरुगधीचे वातावरण पसरले होते. त्याप्रकरणी इशारा देऊनही पुन्हा एकदा शनिवारी झालेल्या अन्य एका सोहळयामुळे कचरा जमा होऊन जैसे थे पडल्याचे जेधे यांच्या निदर्शनास पडले. याकडे वारंवार लक्ष वेधूनही हा प्रकार सुरू असल्याने जेधे यांनी कार्यकत्र्यासह सोमवारी केडीएमसीचे विभागीय कार्यालय गाठून अनोखे आंदोलन छेडले. 20 तारखेला निवेदनाद्वारे महापालिकेचे उपायुक्त सुरेश पवार यांचे लक्ष वेधण्यात आले होते. पण याउपरही 25 तारखेला हीच परिस्थिती पुन्हा एकदा दिसून आल्याचे जेधे म्हणाले. प्रभाग अधिकारी पंडीत यांना कचरा अस्त्यावस्त पडला असल्याची छायाचित्रेही सादर करण्यात आली. त्यांच्याकडून तत्काळ दखल घेण्याचे आश्वासन देण्यात आले. शनिवार आणि रविवारी हे मैदान केवळ खेळाडुंसाठी असावे अशीही मागणी यावेळी मनविसेच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनात जेधे यांच्यासह शहर सचिव प्रितेश पाटील, अमित बगाटे, सचिन कस्तुर, सुहास काळे, कौस्तुभ फडके, गणोश नवले, अनिश निकम, स्वप्नील वाणी, क्षितिज माळवदकर, चिन्मय वारंगे, नंदादीप कांबळे, योगेश चौधरी, जयेश सकपाळ, ज्ञानेश महाडिक आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
क्रीडासंकुलात घाणीचे साम्राज्य, केडीएमसीचे दुर्लक्ष, मनसेचे अनोखे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 5:17 PM