भातसानगर / शहापूर : शहापूर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. शहापूरपासून सापगावपर्यंत जाणारा महामार्गाचा रस्ता जागाेजागी उखडला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे गाेठेघर-सापगाव या गावांतील घरांची अक्षरश: धूळधाण उडत आहे. त्यामुळे आराेग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शहापूर ते सापगाव रस्त्यासाठी गावातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
शहापूरपासून पुढे जाणारा सापगावपर्यंतचा रस्ता हा महामार्ग आहे, यावर विश्वासच बसत नाही. फूटभर खोलीचे असंख्य असे खड्डे या रस्त्याला पडले असून केवळ नाममात्र खड्डे भरण्याची प्रक्रिया केली. मात्र, तद्नंतर आजपर्यंत हा रस्ता तसाच आहे. सापगाव ते शहापूर हे अंतर अडीच किलोमीटर अंतराचे असून या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गोठेघर-सापगाव या गावांतील घरांत दिवसभर धूळ जाऊन अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आता हा रस्ता व्हावा, यासाठी नेते, राजकीय व्यक्ती नाहीत, तर गावकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. कुणीच राजकीय व्यक्ती लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
शहापूर-सापगाव रस्त्याचे काम होत नसल्याने व नागरिकांना होत असलेला त्रास पाहता सापगाव येथील नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे ग्रामस्थ तानाजी अंदाडे, दीपक अंदाडे, नंदकुमार देसले, निवृत्ती देसले, विलास देसले, संजय देसले, गुरुनाथ अंदाडे, लक्ष्मण दुधाळे आदींनी यावेळी सांगितले. दरम्यान, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा विद्या वेखंडे यांनीही लक्ष वेधले आहे. सात दिवसांत हा रस्ता सुरळीत न झाल्यास याच रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एमएसआरडीसी प्रशासनाला त्यांनी दिला आहे.
वाहने नादुरुस्त हाेण्याचे वाढले प्रमाण
- मोठ्या प्रमाणात या महामार्गावरून वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यातील धूळ ही घराघरांत जाऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. अनेक अपघात होत असून अनेकांना आतापर्यंत या खड्ड्यांमुळे जीवही गमवावा लागला आहे.