ठाणे : मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची खाती मिळावी याकरिता शिवसेनेचा हट्ट कायम असल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढलेली असतानाही भाजपमधील काही नवनिर्वाचित आमदारांना मंत्रिमंडळाच्या बाहेर राहावे लागू शकते, अशी दाट शक्यता आहे.
भाजपने २६ खाती आपल्याकडे ठेवताना शिवसेनेला १३ खाती देण्याचा प्राथमिक प्रस्ताव दिला आहे. परंतु, वाटाघाटींमध्ये ही संख्या १८ पर्यंत खेचण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. भाजपने आयारामांना घेतल्याने व त्यांना विविध पदांचे आश्वासन दिले असल्याने ते पाळण्यासाठी भाजपची कसरत सुरू झाली आहे. अशातच पक्षातील इतरांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
मागील सरकारमध्ये भाजपच्या काही मंत्र्यांकडे तीन ते चार खाती होती. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपच पुन्हा एकदा मोठा तर शिवसेना छोटा भाऊ ठरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात आपल्याला स्थान प्राप्त व्हावे, अशी भाजपच्या आमदारांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. मात्र सत्तेकरिता शिवसेनेची भाजपला गरज आहे हे हेरून भाजपने अनेक महत्त्वाच्या खात्यांचा आग्रह धरला आहे. वाटाघाटीत शिवसेना सरस ठरली तर सेनेला साथ देणाऱ्या मुंबई व ठाण्यातील दोन किंवा तीन टर्म विजयी होणाऱ्यांना मंत्रिमंडळात सेना संधी देईल. साहजिकच युतीच्या सरकारमध्ये मोठा भाऊ या नात्याने प्रादेशिक, जातीय व अन्य समतोल साधणे ही जबाबदारी भाजपची असेल. एकाच जिल्ह्याला चार-पाच मंत्रिपदे दिली तर त्यामुळे अन्य जिल्ह्यांत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.गणेश नाईक यांना बाहेर ठेवणे भाजपला अशक्यगणेश नाईक यांना भाजपने अलीकडेच पक्षात घेतले. नाईक यांच्याकडे मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीला बाहेर ठेवणे भाजपकरिता अशक्य आहे. अर्थात नाईक यांच्याकरिता भाजपने बेलापूर विधानसभा मतदारसंघ सोडला नव्हता. त्यामुळे ऐरोलीतून पुत्र संदीप याला माघार घ्यावी लागली होती. जिल्ह्यातील भाजपचे मूळ नेते व राष्ट्रवादीतून २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले काही आमदार यांचा नाईक यांना संधी देण्यास व त्यांचे महत्त्व वाढवण्यास विरोध आहे. त्यांनी दबाव टाकला तर नाईक यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले जाऊ शकते. रवींद्र चव्हाण हे राज्यमंत्री होते. यावेळी त्यांची कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा असल्याचे बोलले जाते. मात्र शिवसेनेला वन, गृहनिर्माण, ग्रामविकास अशी काही खाती गेली तर चव्हाण यांचे कॅबिनेट मंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात. भाजपकडे नगरविकास, गृह आदी खात्यांशी संबंधित राज्यमंत्रिपदे शिवसेनेकडे गेल्यास राज्यमंत्रिपदावरील भाजप आमदारांना कमी महत्त्वाची खाती मिळतील.किसन कथोरे हे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा मंत्रिपदावरील दावा बळकट आहे. कथोरे यांचा शहरी विभागाशी संबंध असून ते प्रतिनिधित्व आदिवासी लोकसंख्या असलेल्या भागाचे करतात. मात्र कथोरे हे ज्येष्ठ नेते असून त्यांना त्यांच्या तोलामोलाचे खाते अपेक्षित असताना सेनेसोबत सुरू असलेल्या रस्सीखेचीत त्यांच्या पदरात काय पडते, याबाबत उत्सुकता आहे.संजय केळकर यांनी ठाणे हा एकेकाळी शहरातील मध्यवर्ती भागातील शिवसेनेचा गड दुसºयांदा जिंकला आहे. सेनेला शह देण्याकरिता केळकर यांचा मंत्रिपदाकरिता विचार केला जाऊ शकतो. मात्र मुख्यमंत्री ब्राह्मण असताना मंत्रिमंडळात आणखी एक ब्राह्मण चेहरा सामावून घेतला जाईल किंवा कसे, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.