ठाणे : मालमत्ताकर आणि पाणीपट्टीवसुलीचे उद्दिष्ट साध्य न झाल्यास संबंधित प्रभागाच्या सहायक आयुक्त तसेच त्या परिमंडळाच्या उपायुक्तांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याबरोबर त्यांची नळजोडणी खंडित करण्याचेही आदेश त्यांनी शनिवारी झालेल्या एका बैठकीत दिले.दरम्यान, डीपी रोडवरील अतिक्रमणांविरुद्ध सोमवारपासून कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या. नागरी संशोधन केंद्र येथे जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांची बैठक घेऊन करवसुलीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीवसुलीबाबत निश्चित केलेले उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या. अर्थात, वसुली न झाल्यास संबंधित प्रभाग समितीचे सहायक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्त यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिल्याने अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत. थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करणे, त्यांची नावे होर्डिंग्ज लावून जाहीर करणे तसेच जप्तीची कारवाई करणे आदी उपाययोजनांच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के वसुली झाली पाहिजे, अशा सक्त सूचना त्यांनी आपल्या हाताखालच्या अधिका-यांना दिल्या. मार्च महिना उजाडला, तरी करवसुलीचे लक्ष्य गाठण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे जयस्वाल आक्रमक झाले आहेत. मार्चअखेरपर्यंत उद्दिष्ट साध्य करण्यावर त्यांनी भर दिला आहे.मालमत्ताकराच्या एकूण ५०० कोटी रुपयांच्या अपेक्षित उत्पन्नापैकी ३५० कोटी रुपयांची वसुली झाली असून अद्याप १५० कोटी रुपये वसूल होणे बाकी आहे, तर पाणीपट्टीच्या एकूण १५० कोटी रुपयांच्या अपेक्षित उत्पन्नापैकी ८० कोटी वसुली झाली असून ७० कोटींची वसुली बाकी आहे.दरम्यान, हरदासनगर, हाजुरी, विद्यापीठ उपकेंद्र रस्ता, वेदान्त हॉस्पिटल, आनंदनगर, वागळे इस्टेटमधील रोड नं. १६ आणि २२ आयटीआयकडे जाणा-या रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर सोमवारपासून कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.चौकटवारंवार नोटीस दिल्यानंतरही अग्निशमन यंत्रणा न बसवलेल्या ‘त्या’ हॉटेल्सवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अशा नियमांचे उल्लंघन करणारी ८६ हॉटेल्स सील करण्याची कारवाई करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे आणि सुनील चव्हाण हेही उपस्थित होते.---------------------------
ठाण्यात मालमत्ता कराची वसुली न झाल्यास पालिकेच्या उपायुक्तांविरूद्धही होणार शिस्तभंगाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 11:22 PM
मालमत्ता आणि पाणीपट्टी वसूलीसाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून यात हलगर्जीपणा करणा-या उपायुक्तांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देण्यात आला आहे. मार्च २०१८ अखेर पाणी आणि मालमत्ता करापोटी २२० कोटींच्या वसूलीचे उद्दीष्ट आहे.
ठळक मुद्देनळजोडणीही होणार खंडीतसोमवारपासून रस्तारूंदीकरण कारवाईचे आयुक्तांचे आदेश २२० कोटींच्या वसूलीचे मार्च अखेर उद्दीष्ट