कल्याण - ''महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडील चालू थकबाकी ९४४ कोटींवर पोहचली असून वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करा. ९० टक्के पेक्षा कमी वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा. तसेच, या महिना अखेर सर्वात कमी वसुली करणाऱ्या कार्यकारी अभियंता व तत्सम अधिकारी यांचे निलंबन करा.'' असे आदेश सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील (भाप्रसे) यांनी सर्व परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहेत.
एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे ही ९४४ कोटींची चालू थकबाकी असून यामुळे महावितरणच्या महसुलावर परिणाम होत आहे. कोकण प्रादेशिक कार्यालया अंतर्गत येणाऱ्या १२ जिल्ह्यात कार्यरत अधिकाऱ्यांच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेताना विजयकुमार काळम पाटील(भाप्रसे) यांनी हे आदेश दिले आहेत. यावेळी विजयकुमार काळम पाटील म्हणाले, ''वीज बिल थकीत ग्राहकांचा पुरवठा तत्काळ तोडा. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी अनधिकृत वीज पुरवठा घेतला असल्यास अशा ग्राहकांविरुद्ध गुन्हा नोंद करा. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर पुन:र्जोडणी शुल्क भरल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाचा वीज पुरवठा सुरु करू नये. तसेच आगामी आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर २९ ऑगस्ट पूर्वी अत्यावश्यक कामांची एमपॅनेलमेंट टेंडर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास प्रादेशिक कार्यालयास अथवा 'प्रकाशगड' या मुख्यालयास संपर्क साधावा. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना विहित प्रक्रियेद्वारे तात्पुरती वीज जोडणी तत्काळ द्यावी. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव अधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या मंडळांची यादी संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी.''
परिमंडळनिहाय पाच महिन्यातील चालू थकबाकी
भांडुप परिमंडळाची एकूण थकबाकी ३२० कोटी असून यामध्ये पेण मंडळाची ९३.६८ कोटी, ठाणे नागरी मंडळाची ११५.५३ कोटी, वाशी मंडळाची ११०.८९ कोटी यांचा समावेश आहे. कल्याण परिमंडळाची एकूण थकबाकी २५४.९१ कोटी असून यामध्ये कल्याण मंडळ १ ची ४३.१६ कोटी कल्याण मंडळ २ ची ७२.०५ कोटी, पालघर मंडळाची ४१.४८ कोटी, वसई मंडळाची ९८.२२ कोटी यांचा समावेश आहे. नाशिक परिमंडळाची १९१. ७२ कोटी थकबाकी असून यामध्ये अहमदनगर मंडळाची ७३.४ कोटी, मालेगाव मंडळाची ३५.५६ कोटी, नाशिक शहरी मंडळाची ४२. ७६ कोटी यांचा समावेश आहे. जळगाव परिमंडळाची एकूण थकबाकी १३०.०४ कोटी असून यामध्ये धुळे मंडळाची ३०.७७ कोटी, जळगाव मंडळाची ८३.५३ कोटी व नंदुरबार मंडळाची १५.७४ कोटी थकीत आहेत. तर कोकण परिमंडळाची एकूण थकबाकी ४७.८३ कोटींची थकबाकी असून यामध्ये रत्नागिरी मंडळाची २८.२१ कोटी व सिंधुदुर्ग मंडळाची १९. ६२ कोटी यांचा समावेश आहे.
मोठ्या नद्यांच्या अनुषंगाने प्रस्ताव देण्याचे आदेश
महावितरण ग्राहकांना अखंड वीज पुरवठा करण्यास बांधील आहे. मात्र कोकण प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक मोठ्या नद्या व नाले यांच्या किनाऱ्यावरील वीज यंत्रणा वाहून गेली होती. यामुळे महावितरणचे अनेक ग्राहक प्रभावित झाले होते. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा अडचणींचा सामना करण्यासाठी प्रत्येक परिमंडळ कार्यालयाने संभाव्य अडचणी लक्षात घेऊन आवश्यकते प्रमाणे आराखडा तयार करून पाठवावा, असे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत.