ठाणे : ठाणे शहरात लसीकरण मोहिमेत अनागोंदी कारभार होत असून, यात प्रशासनाकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप करून यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी यांना मनसेने शनिवारी निवेदन दिले. यात त्यांनी नागरिकांच्या तक्रारींचाही पाढा वाचला.
सलग तीन ते चार दिवस लसीकरण केंद्रे बंद असणे, निश्चित धोरणाचा अभाव, अपुरा साठा, राजकीय पक्षांच्या शाखेत लसीकरणात सर्वसामान्यांशी होणारा भेदभाव, रात्री रांगा लावाव्या लागणे अशा तक्रारी मनसे कार्यालयात येत आहेत. राजकीय जाहिरातबाजी न करण्याविषयी राज्य शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही राजरोस सत्ताधारी पक्षांच्या शाखेत लसीकरण आयोजित करून श्रेय घेण्याचे प्रकार चालू आहेत. या सगळ्या प्रकरणात महापालिका आयुक्तांसह पूर्ण प्रशासनही सहभागी आहे, असा आरोप मनसेने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लसीकरण सर्व ठाणेकर नागरिकांना समान न्यायाने मिळेल, अशी कारवाई करावी, अशी मागणी करून त्यासाठी ठाणे शहरातील सेवाभावी किंवा सामाजिक संस्थांची मदत घेऊन लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविता येईल, असेही सुचविण्यात आले आहे. या वेळी ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महिला शहर अध्यक्षा समिशा मार्कंडे, उपशहर अध्यक्ष नैनेश पाटणकर, सचिव रवींद्र सोनार व इतर उपस्थित होते.