प्रशांत माने
कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाबाजी पाटील यांची उमेदवारी घोषित होताच सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ चारोळ्या फिरू लागल्या आहेत. पाटील यांच्या समर्थकांनी भूमिपुत्राचा मुद्दा पेटवला आहे. तर, शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना सोशल मीडियावर प्राधान्य दिले जात आहे.
सोशल मीडियाच्या प्रभावी वापराचे महत्त्व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झाले. भाजपाला केंद्रात सत्ता मिळवताना याचा खूप फायदा झाला होता. यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत या माध्यमाचा सर्वच राजकीय पक्षांनी वापर करण्यास सुरुवात केली. राजकीय पक्षांच्या वॉर रूममधून सोशल मीडियाचे काम चालते. तेथे उमेदवाराचे आॅडिओ, व्हिडीओ संभाषण तयार केले जाते.उमेदवाराची सकारात्मक, तर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नकारात्मक प्रतिमेची क्लिप, संदेश तयार करून ते व्हायरल केले जातात. मात्र, सध्या तरी याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.कल्याण मतदारसंघात सोशल मीडियावर प्रचार यंत्रणा हाताळण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. शॉर्ट फिल्म, यू-ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅप आदी माध्यमांद्वारे प्रचार केला जाणार आहे. एखाद्याने मत व्यक्त केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया ट्रोल करून भंडावून सोडले जाते आहे. त्यापद्धतीनेदेखील मांडणीकेली गेल्याने लवकरच सेना-राष्ट्रवादीत ट्रोलयुद्ध पाहावयास मिळणार आहे.सध्या राष्ट्रवादीचे उमेदवार पाटील यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर ‘आगरी समाजाचे नेते’, ‘भूमिपुत्र’ अशा पोस्ट टाकल्या जात आहेत. मात्र, पुरोगामी विचारसरणी असलेल्या पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ सुरू असलेला जातीचा प्रचार चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादीने मात्र अशा प्रचाराचा इन्कार केला आहे.जातीनिहाय मते मागणे, हा आमच्या पक्षाचा ट्रेण्ड नाही. आम्ही पुरोगामी विचारसरणीचेच आहोत. आमच्या सोशल मीडियावरील प्रचाराला खऱ्या अर्थाने ८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच सुरुवात होणार आहे.27गावे,बेरोजगारीविरुद्ध संसदीयकारकिर्दीचा आढावाबेरोजगारी, २७ गावांचा मुद्दा आणि पक्षाची ध्येयधोरणे, हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया सेलच्या सूत्रांनी दिली. तर, शिवसेनेकडून खासदार शिंदे यांनी पाच वर्षांत केलेली विकासकामे, याला प्राधान्य देण्याबरोबरच त्यांच्या संसदीय कारकिर्दीचा आढावाही सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.