कल्याण : कल्याणमधील आधारवाडी डम्पिंगचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नेमके काय करता येईल, सध्या महापालिका त्यासाठी कोणती पावले उचलते आहे, त्यात कल्याणकरांचा सहभाग कसा वाढवता येईल, यावर निर्णय घेण्यासाठी आणि हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याबाबत भूमिका ठरवण्यासाठी उद्या, शुक्रवार, १५ जुलैला खास चर्चा होणार आहे. ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ‘आधारवाडी डम्पिंग ग्राउंड समस्या आणि उपाय’ या शीर्षकाखाली हा कार्यक्रम पार पडेल. कल्याण पश्चिमेतील वाडेघर सर्कल येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता ही चर्चा होईल.कल्याण शहर स्मार्ट करायचे असेल तर तेथील कचऱ्याच्या प्रश्नावर उपाय शोधले पाहिजेत, अशी भूमिका महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी घेतली आहे. त्याबरोबरच कचरा तयार होतानाच त्यातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जनजागृतीही सुरू आहे. मात्र, त्यातील नागरिकांचा सहभाग वाढेपर्यंत दीर्घकाळ जाईल. दरम्यानच्या काळात क्षमता संपल्याने आधारवाडी डम्पिंग बंद करावे, या मागणीने जोर धरला. पण, पर्याय उभा राहिला नाही. डम्पिंगला लागणाऱ्या आगीमुळे आधारवाडीचा परिसर दुर्गंधी आणि धुराच्या साम्राज्यात सापडत आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम जसा होतो आहे, तसाच परिसराच्या विकासावरही होतो आहे. त्यावर, या वेळी साधकबाधक चर्चा होईल.याबाबत, सतत पाठपुरावा करणारे ज्येष्ठ वकील शांताराम दातार, घनकचरा प्रकल्पाचे अभ्यासक श्रीकृष्ण भागवत, डम्पिंगचा आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासणारे डॉ. नितीन बावस्कर आणि स्थानिक शिवसेना नगरसेवक मोहन उगले या चर्चेत सहभागी होतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
आधारवाडी डम्पिंगवर आज चर्चा
By admin | Published: July 15, 2016 1:30 AM