पंकज पाटील
अंबरनाथ : रविवारी भरदुपारी चार दरोडेखोरांनी एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घातला. या दरोड्यात चार दरोडेखोरांचा सामना दुकानातील तिघांसोबत झाला. या तिघांनी बंदुकीला न घाबरता, त्यांचा केलेला सामना हा धाडसी होता. त्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. सहा राउंड फायर झाल्यावरही या तिघांनी दरोडेखोरांसोबत संघर्ष करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.
अंबरनाथ सर्वाेदयनगर भागातील भवानी ज्वेलर्सच्या दुकानात दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान सशस्त्र दरोडा घालण्यात आला. यात दरोडेखोरांनी दुकानातील २५ तोळे सोने लंपास केले. दरोडा घालताना चार दरोडेखोरांपैकी दोघांनी आधी आणि नंतर दोघांनी अशा चौघांनी दुकानात प्रवेश केल्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. दुकानात दरोडा घातला जात असताना, दरोडेखोर आणि दुकानदार यांच्यात झालेला संघर्षही सीसीटीव्हीत कैद झाला आहे. भैरवसिंग राजपुत आणि विशनसिंग यांनी सुरुवातीपासून दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारपैकी दोघांकडे दोन बंदुकी असल्याने त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील सोने चोरले. ते पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, लक्ष्मणसिंग याने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. भैरवसिंग आणि विशनसिंग यांनी त्यांचा सामना केला. आपण पकडले जाऊ या भीतीने दरोडेखोरांनी दोन बंदुकीतून सहा राउंड फायर करून लक्ष्मणसिंग याला जखमी केले. गोळी लागल्यावरही दुकानातील कर्मचारी या दरोडेखोरांसोबत लढत राहिले. त्यानंतर, या दरोडेखोरांनी बंदूक तेथेच सोडून दुचाकीवरून पळ काढला. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
दरोडेखोर आणि दुकानमालक व त्याचे कर्मचारी यांनी शसस्त्र दरोडेखोरांसोबत केलेला संघर्षाचे कौतुक सर्वत्र होत आहे, स्थानिकांनीही या दरोडेखोरांसोबत लढा दिला असता, तर त्यांना अटक करणो शक्य झाले असते. मात्र, चार दरोडेखोरांसोबत तीन दुकानदारांचा लढा हा अपुरा पडला, परंतु त्यांनी दाखविलेल्या धाडसाचे पोलीस प्रशासनही स्तुती करीत आहे.