ठाणे : ठाण्यात काही संवेदनशील प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने काम करणे अवघड होत आहे; त्यामुळे आपल्याला येथून कार्यमुक्त करावे, असा मेसेज काही व्हॉटस्अॅप ग्रुपवरून पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या नावाने बऱ्याच ठिकाणी सोमवारी (दि. ९) फॉरवर्ड झाला. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच पोलीस आयुक्तांनी ही मागणी केल्याचे यात म्हटले होते. मात्र, असे काहीही नसून कोणीतरी खोडसाळपणे हा प्रकार केल्याचे स्पष्ट करीत खुद्द आयुक्तांनीच या वृत्ताचा इन्कार केल्याने या प्रकरणावर पडदा पडला.
सोमवारपासून काही व्हॉटस्अॅप ग्रुपवर हा मेसेज अनेक ठिकाणी फॉरवर्ड झाला होता. तोच आयुक्तांपर्यंतही गेला. मितभाषी आणि कर्तव्यकठोर असलेल्या आयुक्तांबाबतच हा मेसेज असल्यामुळे काही पत्रकारांनी काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या गोटातून या मेसेजची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, असे काहीही नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही तोच मेसेज वेगाने व्हायरल होत असल्यामुळे आयुक्तांनीच पुढाकार घेत यावर स्पष्टीकरण दिले. सोमवारी सायंकाळपासूनच असा बनावट मेसेज फॉरवर्ड होत असून काही माध्यम क्षेत्रातील मंडळी कोणतीही खात्री न करता याबाबत ट्विट करीत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. अशा प्रकारच्या अफवा कोणीही पसरवू नयेत, असे आवाहनही पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी केले आहे.