ठाणे : एकनाथ शिंदे यांना कंटाळून नरेश म्हस्के हे काँग्रेसमध्ये जाणार होते. परंतु, त्यांना परत शिवसेनेत घेऊन आलो ही माझी चुक होती, असा गौप्यस्फोट उध्दव ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी केला. उध्दव ठाकरे यांच्यामुळेच म्हस्के यांना जिल्हाप्रमुख पद आणि महापौरपद मिळाले. परंतु, आता ज्या पध्दतीचे राजकारण केले जात आहे, ते चुकीचे असून हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकाला सामोरे जा. शिवसेनेची ताकद आम्ही दाखवून देऊ अशा शब्दात विचारे यांनी एकनाथ शिंदें गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला आव्हान दिलं आहे.
उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर पाटील यांच्या खांद्यावर विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, रविवारी त्यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात असल्याचे सांगितले. या संदर्भात माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. म्हस्के हे नारायण राणे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. परंतु, त्यांची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली. त्यानुसार मी त्यांना घेऊन उद्धव यांच्याकडे गेलो होतो. त्यानंतर म्हस्के यांना जिल्हाप्रमुख आणि महापौरपदही मिळाले. मात्र, आता पोलिसांना हाताशी घेऊन ज्या पध्दतीने कारवाई केली जात आहे, ती चुकीची असल्याचे विचारे यांनी म्हटलं.
पोलिसांच्या खांद्यावर बंदुका ठेवून गोळ्या झाडण्याचे काम बंद करा, अन्यथा जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांनी देखील कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम केले पाहिजे. परंतु सध्या पोलीस यंत्रणा या राज्यकर्त्यांच्या दावणीला बांधल्याचे दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे हिम्मत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला.
गेले भास्कर पाटील कुणीकडे
दरम्यान, भास्कर पाटील यांना काही जणांनी गाडीत बसवून नेले, त्यांच्यावर मानसिक दडपण होते. किंवा त्यांना देखील गुन्हा दाखल करण्याची भिती दाखविली गेली असेल अशी माहिती यावेळी त्यांचे बंधु जंयत पाटील यांनी दिली. परंतु ते आजही आमच्यासोबत असल्याचा दावा त्यांच्यासह खासदार विचारे यांनी देखील केला. पक्षात जबाबदारी मिळत नाही म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांकडे खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर, मीच उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी करुन त्यांना विधानसभा क्षेत्रप्रमुख हे पद दिले आहे. परंतु, त्यांना पद देताच, बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना आपल्याकडे वळविले असल्याचा आरोपही विचारे यांनी केला. मात्र, ते आमच्या सोबतच असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु भास्कर पाटील हे स्वत: या पत्रकार परिषदेला हजर नसल्याचे दिसून आल्याने गेले भास्कर कुणीकडे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.