मुरलीधर भवारकल्याण : प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात असल्याने नदी आणि खाडीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी किमान ६० दशलक्ष लीटर सांडपाण्याच्या नाल्यांपैकी केवळ आठ दशलक्ष लीटर पाण्याचा प्रवाह सांडपाणी केंद्राकडे वळवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन झालेल्या समितीच्या पाहणीनंतर हे उघड झाले आहे. कामाची गती पाहता पुढची डेडलाइन तरी पाळली जाणार की नाही, याविषयी साशंकता आहे.
‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेतर्फे दाखल केलेल्या याचिकेवर १० एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान १७ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे पर्यावरण खात्याच्या सचिवांना आदेश दिले आहे. तसेच दर १५ दिवसांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल द्यावा, असे स्पष्ट केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची एक समिती स्थापन केली आहे. या समितीने कल्याण-डोंबिवलीतील सांडपाणी प्रक्रियेचे काम कितपत प्रगतीपथावर आले आहे, याची पाहणी केली. समितीचे सदस्य ३० एप्रिलला आले होेते. ही पाहणी दोन दिवस चालली. पाहणी करणाऱ्या समितीच्या असे निदर्शनास आले आहे की, आठ नाल्यांचा प्रवाह वळवून सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे नेले जाईल. आठ नाल्यांपैकी काही मोजक्याच नाल्यांचा प्रवाह वळता झाला आहे. ६० दशलक्ष लीटर सांडपाण्याचा प्रवाह वळवणे अपेक्षित असताना आठ दशलक्ष लीटर चा प्रवाह केंद्राकडे वळवल्याची बाब समितीच्या लक्षात आली.
महापालिकेने सांडपाणी वळते करण्याचे काम फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण केले जाईल, असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. हे काम डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण करण्याची डेडलाइन होती. डेडलाइन पुढे गेल्यामुळे समिती पाच दौरे दर १५ दिवसांनी करणार आहे. त्यानंतर, या अपूर्ण कामांचा अहवाल दिला जाईल. न्यायालय १७ जुलैला काय आदेश देईल, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीची २०२० ची डेडलाइनही पाळली जाणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
प्रदूषण मंडळाच्या नोटिशीला मोघम उत्तरडोंबिवली औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी वाहिन्या फुटल्या आहेत. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमआयडीसीला २६ एप्रिलला नोटीस बजावली. ही नोटीस मिळताच फुटलेल्या रासायनिक सांडपाण्याच्या वाहिन्यांची पाहणी एमआयडीसीने करून दुरुस्ती केली जाईल, असे मोघम उत्तर मंडळास दिले गेले.
आठवडाभरापूर्वी केडीएमसीच्या हद्दीतील तीन कत्तलखाने २४ तासांत बंद करण्याची नोटीस मंडळाने महापालिकेला दिली होती. महापालिकेने या नोटिशीनंतर कत्तलखाने बंद केलेले नसून त्यात पत्रीपूल येथील जुन्या कत्तलखानाही समावेश आहे. महापालिकेनेही प्रक्रिया करू, यंत्रणा उभारू, असे उत्तर दिले.