लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अमली पदार्थांच्या गुन्ह्यात पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग आढळला तर त्याला थेट बडतर्फ करण्यात यावे, अशी महत्त्वाची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिस परिषदेत केली. तसेच गुन्ह्यांचा तपास अधिक योग्य पद्धतीने होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या तसेच महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
ठाण्याच्या रेमंड गेस्ट हाऊस येथील कम्युनिटी हॉलमध्ये राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्था या विषयावर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परिषद मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोईर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी परिषदेत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले.
परिषदेत नव्याने तयार करण्यात आलेल्या तीन नवीन कायद्यांचे सादरीकरण झाल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. सायबर गुन्हे, महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराबाबतही सादरीकरण केले. हे गुन्हे रोखण्यासाठी आणि उघडकीस आणण्याकरिता तसेच या गुन्ह्यात आरोपपत्र कसे लवकर दाखल होईल, यासंदर्भात चर्चा झाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
परिषदेत ड्रग्जसंदर्भात कशी कारवाई सुरू आहे आणि ती यापुढे कशी झाली पाहिजे, या संदर्भातही चर्चा झाली. ड्रग्ज संदर्भातील कुठल्याही गुन्ह्यात कुठल्याही रॅकिंगचा पोलिस अधिकारी, कर्मचारी गुंतलेला असेल तर त्याला बडतर्फ केले जाईल, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
वेळेत आरोपपत्र दाखल करा
महिला अत्याचार प्रकरणात वेळेत आरोपपत्र दाखल व्हावे. जप्त झालेली संपत्ती परत करण्याची तरतूद करावी, जेणेकरून सहा महिन्यांत मुद्देमाल परत दिल्याने पोलिस ठाणे रिकामे होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.