अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : नवी मुंबई, मिराभाईंदरमधील भाजपचे नाराजी नाट्य थेट सांयकाळपर्यंत ठाण्यात आल्याचे दिसून आले. भाजपच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत देखील अनेक पदाधिकाºयांना नरेश म्हस्के यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त केली. तसेच काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देत आम्ही काम करणार नसल्याचा इशाराच दिला. अखेर दिड तासाच्या चर्चेनंतर नाराजी नाट्य दूर झाल्याचा दावा भाजपच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे ठाण्यातील नाराजी नाट्य किमान शमल्याचे दिसत आहे.
नवीमुंबईतील पदाधिकाºयांनी गुरुवारी सकाळी राजीनामे दिल्यानंतर मिराभाईंदरमधील पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामा देत नाराजी व्यक्त केली. तर ठाण्यातील भाजप कार्यालयात शुक्रवारी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के हे आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याने त्या निमित्ताने जिल्हा कार्यकारणीची बैठक लावण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील १५० पदाधिकारी उपस्थित होते. परंतु या बैठकतही अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट नाराजीचा सुर लावला. काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले. तर काही पदाधिकाऱ्यांनी संजय केळकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गळ घालत घोषणाबाजीही केली.
तसेच आतापर्यंत शिंदे सेनेकडून महापालिका असेल किंवा विधानसभा निवडणुक असेल त्यात कशा पध्दतीने वागणूक देण्यात आली. याचा पाढाच अनेक पदाधिकाऱ्यांनी वाचला. भाजप नसेल तर आम्ही काम करणार नसल्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. अखेर कार्यकर्त्यांचे म्हणने ऐकल्यानंतर वरीष्ठांनी त्यांची मनधरणी केली. आपले उमेदवार हे नरेंद्र मोदी असून त्यांना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, त्यांच्यासाठी आपल्याला महायुतीचा धर्म पाळावाच लागेल अशी हाक वरीष्ठांनी कार्यकर्त्यांना दिली. दिड तास खलबते झाल्यानंतर अखेर कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात आली. तसेच पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देखील मागे घेतले.
कार्यकर्त्यांची भावना असते, मात्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असल्याने सर्वांना एकदिलाने काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच त्यांची नाराजी दूर करुन त्यांनी आपले राजीनामे देखील मागे घेतले आहेत. - संजय केळकर - आमदार, भाजप, ठाणे शहर
महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याची तयारी करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोणत्याही प्रकारची नाराजी किंवा राजीनामे कोणीही दिलेले नाहीत. - संजय वाघुले - शहर अध्यक्ष, भाजप, ठाणे शहर