ठाणे - कचरा विल्हेवाटीसंदर्भात कोणताही निर्णय गृहसंकुलांवर लादला जाणार नाही. सर्वांच्या समस्या जाणून तसेच त्यांच्या सूचनांचा विचार करून सर्वसहमतीनेच निर्णय होईल, अशी ग्वाही ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिली. ही समस्या मोठी असून, यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि गृहसंकुलांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक लवकरच घेतली जाईल. या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, शासनाने डम्पिंग ग्राउंडला परवानगी न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याने येथून पुढे मोकळ्या जागेवर कचरा न टाकता त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.कचऱ्याची विल्हेवाट गृहसंकुलांनीच लावण्याबाबतचे आदेश ठाणे महापालिकेने दिले होते. विल्हेवाट न लावणाºया गृहसंकुलांचा कचरा १५ जुलैपासून न उचलण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला होता. पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या निर्णयाला सप्टेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या आदेशानुसार महापालिकेने गृहसंकुलांचा कचरा न उचलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. रविवारी विविध गृहसंकुलांच्या कचरा विल्हेवाटीसंदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी गृहसंकुलांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. गृहसंकुलांच्या विनंतीनुसार डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या तळमजल्यावर आयोजित या बैठकीला दीडशेहून अधिक गृहसंकुलांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वसंत विहार अॅपेक्स कमिटी, हिरानंदानी इस्टेट रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन, हिरानंदानी मेडोज रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन, पीटीआरए, ठाणे हाउसिंग सोसायटीज फोरम, ठाणे सिटीझन फोरम, ब्रह्मांड अशा विविध गृहसंकुलांचे प्रतिनिधी आणि मनपा पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.जबाबदारी महापालिकेचीकचरा उचलणे आणि कचºयाची विल्हेवाट लावणे, ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे मत याप्रसंगी गृहसंकुलांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.गृहसंकुलांकडे पुरेशी जागा नाही, निधी नाही आणि कचºयाची विल्हेवाट लावण्याचे कौशल्यदेखील नाही. प्रकल्प उभारल्यानंतर तो चालवण्याची आणि उद्या त्यात काही बिघाड झाला, तर ती जबाबदारी घेण्याची क्षमता गृहसंकुलांकडे नाही, असे अनेक मुद्दे याप्रसंगी मांडण्यात आले.
कचरा विल्हेवाटीचा निर्णय सर्वसहमतीनेच, पालकमंत्र्यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 3:47 AM