मीरा रोड - भाईंदर पूर्वेच्या आरएनपी पार्क भागातील महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह धोकादायक आणि मोडकळीस आल्याचे भाजपच्या काही नगरसेवकांनी म्हटले आहे. तर या विरोधात भाजपच्याच काही नगरसेवकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी वारातील चांगल्या स्वच्छतागृहला हात लावल्यास आंदोलन करू, असा इशारा दिला आहे . (Dispute between BJP corporators over public toilets)
शानू गोहिल या आरएनपी पार्क परिसरातील काँग्रेसमधून भाजपत आलेल्या नगरसेविका आहेत. त्यांनी स्थायी समितीत ठराव केला की, आरएनपी चिंतामणी नाल्याच्या शेजारी असलेले शौचालय, हे धोकादायक स्थितीत असून मोडकळीस आले आहे. परिसरात नवीन शौचालय पालिकेने बांधले असताना लोक जीव धोक्यात घालून जुन्या शौचालयात जातात. यामुळे हे शौचालय तोडण्यास सभा मंजुरी देत आहे. समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने ठराव मंजूर झाला.
मात्र, स्थानिक ज्येष्ठ भाजप नगरसेवक रोहिदास पाटील, मदन सिंह, सह प्रभाग समितीच्या सभापती मीना कांगणे यांनी मात्र स्वच्छतागृह तोडण्याच्या या ठरवाला जोरदार विरोध केला आहे. या तिनही नगरसेवकांनी तसेच स्थानिक सुमारे ९० नागरिकांनी स्वच्छतागृह तोडण्यास विरोध करणारे पत्र महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना दिले आहे. मदन सिंह यांचे म्हणणे आहे कि, सदर ठिकाणी ५० ते ६० वर्षां पासून शौचालय आहे . ८ ते १० वर्षां पूर्वी आपल्या मागणी वरून जुने शौचालय तोडून नवीन शौचालय पालिकेने बांधले . सदर शौचालयाचा परिसरातील परशुराम नगर , कोळी नगर , रमाकांत चाळ, काशीबाई चाळ, माधव पार्क आदी भागातील रहिवासी, तसेच ये-जा करणारे नागरिकही वापरतात.
आत्ताचे शौचालय हे चांगल्या स्थितीत असून वापरात असतानासुद्धा ते धोकादायक ठरवून पाडण्याचा काही नगरसेवकांचा घाट हा लाजिरवाणा आहे. यांना जनतेच्या सुविधेशी काही देणेघेणे नाही. उलट पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करून स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. रक्षकच भक्षक बनले आहेत, असा थेट हल्ला सिंह यांनी चढवला आहे .
ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील म्हणाले, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वत्र शौचालय बनवण्याची मोहीम राबवत असताना येथे मात्र चांगली शौचालये तोडण्याचे कारस्थान चालले आहे . हा तर थेट पंतप्रधानांच्या मोहिमेलाच धक्का देण्याचा प्रकार आहे. मीना कांगणे यांनीसुद्धा चांगल्या स्थितीतील शौचालय तोडण्यास लेखी पत्र देऊन विरोध केला आहे. नगरसेवकांसह रहिवाश्यांनीसुद्धा सह्या करून निवेदन दिले असून शौचालय तोडल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे .
जनतेच्या खर्च केलेला पैसा वाया घालवून स्वतःच्या स्वार्थासाठी मनमानी करणारे नगरसेवक तांत्रिक ज्ञान नसताना हे शौचालय धोकादायक ठरवत असतील, तर यांना मुन्नाभाई इंजिनियर अशीच उपाधी द्यावी लागेल, असा टोला नागरिकांमधून लगावला जात आहे. तर शानू गोहिल मात्र , शौचालयाची अवस्था बिकट असून काही लोक आयुक्तांची दिशाभूल करत असल्याचा दावा करत आहेत .