नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, उल्हासनगर आणि ठाणे महापालिकेच्या एप्रिल महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र निवडणुकीच्या अगोदरच महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांत कलगीतुरा पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करायची की नाही, याबाबत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आमने-सामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीबाबत सध्याच्या परिस्थितीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची चांगली ताकद आहे. मात्र जिल्हा ताब्यात ठेवायचा असल्यास अहंकार बाजूला ठेवून शिवसेनेने महाविकास आघाडीबाबत चर्चा करावी, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना केले आहे. महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. कारण आघाडी दोन्ही पक्षांच्या फायद्याची आहे. काही ठिकाणी शिवसेनेची, तर काही ठिकाणी आमची ताकद आहे. त्यानुसार चर्चा होण्याची गरज आहे. परंतु शिवसेनेने एकला चलो... ची भूमिका घेतल्यास त्याचा फटका दोघांनाही बसण्याची शक्यता आहे, असे आव्हाड यांनी म्हटले होते.
एकूणच महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी व्हावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा असली तरी शिवसेनेकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. गुरुवारी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना याबाबत छेडले असता, शिवसेना फायद्या-तोट्याचा कधीच विचार करीत नसल्याचा पलटवार त्यांनी केला. महाविकास आघाडीतील नेत्यांनी कोणाची मने दुखावतील अशी वक्तव्ये करू नयेत, असा सल्ला सुध्दा शिंदे यांनी आव्हाड यांना दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमधील दोन बड्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वाक्युध्दामुळे भाजपचे मात्र मनोरंजन होताना दिसत आहे.