कल्याण : शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या शिवाजी चौकात गुरुवारी वाहतूक कोंडी असल्याने एसटी बस चालकास थांबण्याचा इशारा करणाऱ्या वाहतूक पोलिसासोबत चालकाचा वाद झाला. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडली.
शिवाजी चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते. कल्याण-आग्रा रोडवर भिवंडीच्या दिशेने सहजानंद चौक आहे, तर कल्याण स्टेशनच्या दिशेने गुरुदेव हॉटेल चौक आहे. पुढे सरळ गेल्यास बैलबाजार चौक आहे. या सर्वच चौकांत वाहनांची कोंडी होते. गुरुवारीही पुढच्या चौकात कोंडी झाल्याने शिवाजी चौकात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसाने भिवंडी-कल्याण एसटी बसच्या चालकास हात करत थांबण्यास सांगितले. त्यावेळी बसचालक खाली उतरला. त्याच्यासोबत महिला कंडक्टरही खाली उतरली. तेथे बस चालक, वाहक आणि वाहतूक पोलीस यांच्या वाद झाला. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडली.
दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यामुळेही वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाणपुलावरील खड्डे प्रशासनाकडून बुजविले होते. कल्याण-शीळ रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. वाहतूक कोंडीमुळे एका दुचाकी चालकाला दुसऱ्या दुचाकी चालकाचा धक्का लागल्याने दुचाकी चालक चंदन यादव याला रॉडने मारहाण केली होती.
--------------------------