मीरारोड - राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून दिड महिना झाला नाही तोच स्थानिकांना कोणाला विश्वासात न घेता अंकुश मालुसरे यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याच्या विरोधात मीरा भाईंदर मधील राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ थेट राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या दरबारी पोहचले .राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळात पक्ष सोडून जाणारे पदाधिकारी - नेते आता महाविकास आल्या नंतर पुन्हा राष्ट्रवादीत घर वापसी करू लागले आहेत . मीरा भाईंदर मध्ये देखील माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील व आसिफ शेख सह माजी महापौर निर्मला सावळे आदी अनेकांनी राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश केला . मालुसरे सुद्धा राष्ट्रवादीत परत आले .शहरात एकेकाळी सत्तेत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा बळकट करायची तर सक्षम - लोकाभिमुख नेतृत्वाची उणीव असली तरी पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस जिवंत ठेवणाऱ्या जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर सह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच २ फेब्रुवारी रोजी अंकुश मालुसरे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले .त्यातूनच पेंडुरकर सह पक्षाच्या पदधकाऱ्यांनी मालुसरे यांच्या नियुक्ती विरोधात संताप व्यक्त करत त्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कडे गाऱ्हाणे मांडले . त्या नंतर खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा घडला प्रकार सांगण्यात आला . यावेळी मसूलरे यांच्या बद्दलच्या असलेल्या तक्रारी सुद्धा नेत्यानं समोर मांडण्यात आल्या . पवार व सुप्रिया यांनी आपण जातीने प्रदेशाध्यक्षांशी बोलून माहिती घेऊ असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले .मालुसरे यांच्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीची माहिती मीरा भाईंदरचे निरीक्षक संतोष धुवाळी यांना सुद्धा नसल्याची चर्चा आहे . राष्ट्रवादीच्या फ्रन्टल सेलचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी , ब्लॉक अध्यक्ष , जिल्हा समिती पदाधिकारी , बूथ अध्यक्ष आदींनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हितासाठी मालुसरे यांच्या नियुक्तीला विरोध केला असल्याचे पेंडुरकर म्हणाले .
मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद नियुक्तीचा वाद थेट पवारांच्या दरबारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 2:42 PM