लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : कात्रज परिसरातील गुरुकुल इंटरनॅशनल शाळेत पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात फी भरण्यावरून वाद निर्माण झाला आहे. शाळेला सरकारचा कोणताही जीआर न आल्याने पालकांनी पूर्ण फी भरावी, असा आग्रह शाळा प्रशासनाने धरला आहे, तर पालकांनी लॉकडाऊनच्या काळात शाळेकडून केवळ ऑनलाइन शिक्षण दिले असल्याने फीमध्ये कपात करावी, अशी मागणी केली आहे.
राज्य सरकारकडून शाळांची फी माफीची घोषणा करण्यात आल्यानंतर खाजगी शाळांना फी माफीचा कोणताही जीआर मिळाला नसल्याने पालक आणि शाळांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. बदलापूरमधील अनेक खाजगी शाळांमार्फत अजूनही पालकांकडून पूर्ण फी आकारली जात आहे. फी माफी व्हावी, यासाठी गुरुवारी बदलापूरमधील कात्रप परिसरात असलेल्या गुरुकुल इंटरनॅशनल या शाळेत पालकांनी एकच गर्दी केली होती. या पालकांची गर्दी आणि रोष पाहता शाळेकडून तातडीची पालकांसमवेत बैठक घेण्यात आली. विद्यार्थ्यांना फीमध्ये सूट मिळावी तसेच शाळेत न झालेल्या इतर उपक्रमांचीही फी माफ व्हावी, अशी मागणी पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनल नाईक यांच्याकडे केली.
------------------------------------------
पालकांना नाहक मनस्ताप
फी माफीसंदर्भात शाळेची बाजू जाणून घेतली असता आम्हाला या संदर्भात राज्य सरकारकडून कोणताही आदेश किंवा प्रत प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. तसेच आम्ही आमच्या शाळेमार्फत खरोखरच अडचणीत असणाऱ्यांना शक्य होईल, त्याप्रमाणे मदत करत आहोत. तसेच आजच्या बैठकीसंदर्भात सर्व निर्णय कमिटी घेणार असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले. मात्र, शाळा आणि सरकार यांच्या अनागोंदी कारभारामुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.