मीरारोड - महापालिका आयुक्तांच्या दालनात महापौरांसह माजी आमदारांनी घेतलेल्या बैठकीवरुन टिकेची झोड उठली आहे. शिवसेना, काँग्रेस, मनसे, बविआ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कारवाई करा असे सांगतानाच आयुक्त दालन बैठकीसाठी देण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर देखील हा मुद्दा गाजत आहे. काही दिवसांपुर्वीच आयुक्तांनी बोलावलेल्या प्रशासकिय बैठकीत महापौरांसह हजेरी लावत माजी आमदारांनी बैठक चालवल्याने आयुक्तांवर टीका झाली होती.
आयुक्तांचा नागरीकांना भेटण्याची वेळ मंगळवारी असली तरी आयुक्त बालाजी खतगावकर हे कामा निमित्त बाहेर असल्याने सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी लोकांच्या तक्रारी ऐकुन घेतल्या होत्या. दरम्यान आयुक्त दालनात असलेल्या बैठक कक्षात महापौर डिंपल मेहता व माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी अन्य नगरसेवक, पदाधिकारायांसह मुर्धा ते मोर्वा भागातील प्रतिनिधीं सोबत बैठक घेतली. रस्ता रुंदिकरणा मुळे गावातील जुनी घरं बाधित होणार असल्याने स्थानिकांनी रविवारी गावात बैठक घेतल्यावर सोमवारी आमदार गीता जैन यांची भेट घेतली होती.
महापौरांसोबत बसुन त्याच प्रकरणावर माजी आमदारांनी बैठक चालवली. ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी देखील मेहतांना आधी पासुन घडलेला घटना क्रम सांगतानाच आपली मागणी आणि विरोध स्पष्ट केला. त्यावर मेहतांनी शनिवारी पाहणी करु असे आश्वस्त केल्याचे सुत्रांनी सांगीतले. परंतु आयुक्तांचे दालन असताना महापौरांच्या सोबत माजी आमदारांनीच आयुक्त बसतात त्या जागी बसुन बैठक चालवल्याचे पडसाद प्रसिद्ध केलेल्या फोटो वरुन उमटले आहे.
महापौर डिंपल मेहतांनी मात्र आयुक्तांना या बैठकीची कल्पना दिली होती व ते स्वत: हजर राहणार होते. पण त्यांना पूर्वनियोजित कामा मुळे बैठकीला उपस्थित राहता आले नाही असा खुलासा केला आहे. मुर्धा - राई - मोर्वा गावातील रहिवासी रस्ता रुंदिकरणाच्या कामा वरुन रास्ता रोको करणार असल्याने तातडीची बैठक आपल्या अध्यक्षते खाली बोलावली होती. माजी आमदार मेहता, सभागृहनेते रोहिदास पाटील , स्थानिक नगरसेवक व नागरीक बैठकीला होते. आपल्या दालनाचे काम सुरु असल्याने आयुक्तांशी चर्चा करुनच बैठक घेतली आहे. पण आयुक्तांच्या स्थानावर माजी आमदार बसल्याचा दुष्प्रचार करुन बदनामीचा प्रयत्न काही लोक वारंवार करत असल्याचे महापौर यांनी खुलाशात म्हटले आहे.
दरम्यान सोशल मीडियावर तर आयुक्तांची खिल्ली उडवली जात असुन सत्ताधारायांवर टिका पण होत आहे. माजी नगरसेवक रोहित सुवर्णा, काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे, बविआचे निलेश साहु, मनसेचे सचीन पोपळे यांनी तर आयुक्तांना लेखी तक्रार देऊन गैरवापरा प्रकरणी मेहतांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच आयुक्त दालन आम्हाला पण जनहितासाठी बैठक घेण्यास द्या असे म्हटले आहे.
आयुक्तांचाच यात वरदहस्त असुन या आधी देखील आयुक्तांनी बोलावलेल्या प्रशासकिय बैठकीत मेहतांना बसु देत ती बैठक त्यांना चालवायला दिली होती असे आरोप होत आहेत. त्यावर आयुक्तांनी प्रशासकिय बैठकीत महापौरांसह मेहता येऊन बसल्याचे सांगत आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते. सेनेचे खासदार राजन विचारे व आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यावर आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले होते.
शिवसेनेचे शहर प्रमुख लक्ष्मण जंगम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांनी सुध्दा सततच्या या गैरप्रकाराची गांभीर्याने दखल आयुक्तांनी घ्यावी असे म्हटले आहे. महापौर सद्या उपमहापौरांच्या दालनात बसत असुन तेथे तीन मोठ्या खोल्या आहेत. या आधी महापौर आदी पदाधिकारी आपल्या दालनातच बैठका घेत असत. महापौरांना जनतेचे ऐकायचे आहे तर विशेष बैठकीची खोली कशाला असा सवाल देखील तक्रारदारांनी केला आहे. महापौरांच्या आड माजी आमदारांना कारभार चालवण्यासाठीचा हा सर्व आटापीटा असल्याचा आरोप त्यांनी केलाय.