ठाणे : लग्नसराईच्या दिवसांत पुन्हा एकदा लॉकडाऊनचे विघ्न येण्याची शक्यता निर्माण झाल्याने विवाह, मुंजी, साखरपुडे आदी समारंभांकरिता हॉलची व्यवस्था करणाऱ्या मालकवर्गामध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या काही दिवसांत सर्व सुरळीत झाल्याने व लोकल सुरू असल्याने विवाहसोहळे धूमधडाक्यात सुरू झाले होते. त्यामुळे खोळंबलेल्या विवाहांच्या बुकिंगने हॉलमालक सुखावले होते.
मात्र, अचानक कोरोना वाढू लागल्याने ज्यांनी हॉल बुक केलेत त्यांनी केवळ १०० पाहुण्यांनाच निमंत्रित करण्याचे आवाहन मालकवर्गाने केले आहे. अनेक घरांत वधू-वरांचे कुटुंबीय अगोदरच शेकडो पत्रिका वाटून मोकळे झाले असल्याने आता पाहुण्यांना तुम्ही येऊ नका, असे कसे सांगायचे, हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे काहींनी बुकिंग रद्द करण्याचा विचार केला आहे, तर काहींनी बोहल्यावर चढण्याचा बेत पुढे ढकलला असल्याने पुन्हा आलेल्या निर्बंधांमुळे लाखोंचे नुकसान झाल्याची भावना हॉलमालकांनी व्यक्त केली.
कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारने सार्वजनिक ठिकाणी लॉकडाऊनचे नियम पुन्हा एकदा लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मास्क वापरा, गर्दी टाळा; अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिला. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.
राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का, याची यंत्रणेकडून तपासणी होणार आहे. ज्यांनी विवाहसाठी हॉलचे आगाऊ बुकिंग केले आहे, त्यांच्याशी संपर्क साधून हॉलमालक, व्यवस्थापक विवाहसोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांची यादी अगोदर देण्याचे आवाहन करीत आहेत. काहींनी पाहुण्यांच्या नोंदी, संपर्क क्रमाकांसोबत मागितल्या आहेत, तसेच तापमान तपासणे, दोन खुर्च्यांमधील अंतर आणि प्रत्येकाने मास्क घातला की नाही, यावर लक्ष ठेवण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करणार आहेत.
कुठल्या सोहळ्याला किती पाहुणे जेवले, त्या प्रत्येक पानावर हॉलचा नफा अवलंबून असतो. माणसेच कमी बोलवायची बंधने लागू केल्याने हॉलचा नफा झपाट्याने घसरला आहे. पाहुण्यांची संख्या कमी झाल्याने कर्मचारीदेखील कमी केले असल्याचे हॉलमालकांनी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.