ठाणे : ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी म्हणजेच कळवा रुग्णालयाजवळील एसटी वर्कशॉपच्या जागेवर पालिकेचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे करण्याला, तसेच ठाणे स्टेशनजवळील एसटी स्टँडची जागा भूमिगत पार्किंगसाठी द्यायला परिवहन विभागाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे; परंतु कळवा येथील जागेवरून आता शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. मुळात शिवसेनेचे स्वर्गीय आनंद दिघे यांच्यामुळेच ही जागा एसटीला मिळाली होती; परंतु आता तीच पुन्हा त्यांच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे, तसेच कळवा रुग्णालयावर महापालिका दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च करीत असून, त्यात सुधारणा होताना दिसत नाही. असे असताना आता पुन्हा नव्याने हॉस्पिटलचा घाट कशासाठी, असा सवालही केला जाऊ लागला आहे.
कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयाला लागून असलेल्या एसटी वर्कशॉपच्या जागेचा पुनर्विकास करून त्याजागी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे प्रयत्नशील होते. त्यानुसार नुकतेच मंत्रालयात एका विशेष बैठकीत या प्रकल्पाचा सुधारित विकास आराखडा परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासमोर सादर केल्यानंतर त्यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे.
आता एसटी महामंडळाच्या याच जागेवरून आता शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या काळात ती मिळविण्यासाठी खाजगी विकासकांसह राजकीय मंडळींचादेखील यावर डोळा होता; परंतु दिघे बाजूने उभे राहिल्याने ती एसटी महामंडळाला मिळाली; परंतु आता त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून याच जागेवर आता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे निश्चित केल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. मुळात एसटी वर्कशॉपच्या बाजूलाच महापालिकेचे कळवा रुग्णालय आहे. तेथे महापालिका विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे.
............
पूर्वी ठाणे शहराची लोकसंख्या कमी होती, तसेच शहराच्या दृष्टिकोनातून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची निकड नव्हती; परंतु आता लोकसंख्या वाढली असून, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची गरज असल्याने त्यानुसारच हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
........
एकेक करून एसटी महामंडळाच्या जागा ताब्यात घेतल्या जात आहेत. मुळात, महापालिकेचे कळवा रुग्णालय सुरू असून, त्यावर कोट्यवधींचा निधी खर्च करून रुग्णांना योग्य त्या प्रमाणात उपचार मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे त्याच रुग्णालयाला जर सुपरस्पेशालिटी केले, तर काही हरकत नाही. मात्र, एसटीची जागा घेऊ नये एवढीच मागणी आमची असणार आहे.
(सचिन शिंदे - अध्यक्ष, ठाणे जिल्हा इंटक, काँग्रेस)