भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या चेणा येथील मराठी शाळा क्र. १०मध्ये तीन महिन्यांपूर्वी डिजिटल वर्गाचा उद्घाटन सोहळा शाळा व्यवस्थापन समितीने ठेवला होता. त्याच्या निमंत्रणपत्रिकेत आमदार प्रताप सरनाईक व इतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नावांचा उल्लेख नसल्याने त्या लोकप्रतिनिधींचा अपमान झाल्याचा दावा करत सरनाईक यांनी गेल्या वर्षी अधिवेशनात हक्कभंगाची सूचना मांडली होती. त्याची दखल घेत संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शाळा मुख्याध्यापकांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे.मुख्याध्यापकांच्या वार्षिक वेतनावर सुमारे ४० हजारांवर गदा येणार असल्याचे समोर आले आहे. चेणा येथील पालिका शाळा क्रमांक १० मध्ये १२ आॅक्टोबर २०१७ रोजी डिजिटल वर्गाचा उद्घाटन सोहळा शाळा व्यवस्थापन समितीने ठेवला होता. त्याच्या निमंत्रणपत्रिकेत सरनाईक यांच्यासह इतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नावांचा उल्लेख टाळला होता.शाळा व्यवस्थापन समितीने सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली इतर लोकप्रतिनिधींच्या नावांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याने त्या लोकप्रतिनिधींचा अपमान झाल्याचा दावा करत सरनाईक यांनी विधानसभा अधिवेशनात तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते व शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाची सूचना मांडली होती. पालिकेने सादर केलेल्या खुलासा असमाधानकारक ठरल्याने राज्यमंत्र्यांनी शाळेचे मुख्याध्यापक विश्वास हिरे यांच्यावर कारवाईचा बडगा उचलत त्यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखली.>निलंबनाची केली मागणीपत्रावर प्रताप सरनाईक यांचे समाधान न झाल्याने त्यांनी राज्यमंत्र्यांशी पुन्हा पत्रव्यवहार करून पालिकेचे शिक्षणाधिकारी देशमुख व मुख्याध्यापकांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.
सरनाईकांचा उल्लेख टाळणे मुख्याध्यापकाला भोवले, अधिवेशनात हक्कभंगाची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 3:41 AM