ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रांत आवाजाच्या विशिष्ट मर्यादेत ढोल-ताशे वाजवण्यास पोलिसांनी सोमवारी रात्री परवानगी दिल्याने या उत्सवावर गेले काही दिवस घोंगावणारे विघ्न दूर झाले आहे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दाही मार्गी लागला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्याचा मुद्दा मांडला. त्याला पोलीस राजी झाल्याचा दावा त्यांनी केला. पारंपरिक वाद्यांना कोणत्याही अटी न घालता सरसकट परवानगी देण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी कोणत्याही मंडळांना किंवा पथकांना नोटिसा बजावलेल्या नाहीत. तशा बजावल्या असतील, तर त्या मागे घेण्यासाठी पोलिसांशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले; तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही हा मुद्दा योग्य पद्धतीने मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, आयोजक, दहा ढोल-ताशा पथके यांची भेट घडवून आणली. त्यात शांतता क्षेत्र वगळता अन्यत्र ढोल-ताशे वाजवावे, यावर एकमत झाले. त्यानुसार तीन पेट्रोलपंप, चिंतामणी, विष्णूनगर, राम मारूती रोड येथे ही पथके आपली कला सादर करतील. या तोडग्यामुळे ढोल-ताशा पथकांचा प्रश्न सुटण्याबरोबरच पोलिसांचा नियमही पाळला गेला आहे.ढोल पथकांनी निश्चित मर्यादेतच ढोल बडवून आनंद साजरा करावा. ठरलेल्या अटी पाळाव्या, असे सांगत ठाणे शहरातील विविध ढोल-ताशा पथके तसेच आयोजकांना परवानगी दिल्याची माहिती सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.ठाणे शहर परिमंडळ एकचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी मात्र विविध ढोल-ताशे पथकांना, तसेच त्या त्या ठिकाणच्या स्वागतयात्रांच्या आयोजकांना आवाजाच्या मर्यादा पाळण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. ध्वनीप्रदूषणामुळे वृद्ध, रुग्ण, विद्यार्थी आणि मुलांना मानसिक तसेच शारिरीक त्रास होतो. १८ जुलै २००५ च्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ सह ध्वनीप्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियमावली २००१ च्या कलमानुसार ध्वनिक्षेपकांच्या वापरांची वेळ मर्यादा सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत आहे. या वेळ मर्यादेत ध्वनिक्षेपकाची कमाल ध्वनी तीव्रता कशी असावी, याबाबतच्याही सूचना या नोटिसांमध्ये देण्यात आल्या आहेत. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांची वाद्ये, डीजे, ध्वनीक्षेपक आदी सामग्री जप्त करण्यात येईल, असेही नोटिशीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)स्वागतयात्रेत पारंपरिक वाद्य वाजविण्यास अडचण येणार नाही. ढोल-पथकांत एकाच वेळी १० ते १५ ऐवजी चार ते पाच जणांनी मिळून वाद्य वाजविल्यास त्यांना आवाजाची पातळी कमी करता येईल. संबंधित आयोजकांना वेगवेगळया परवानग्या देतांनाच अटी शर्ती पाळाव्या, असे सुचवले आहे. ध्वनीप्रदूषणाची मर्यादा पाळण्याबाबत सांगितले आहे.’’- सुनील लोखंडे, उपायुक्त, वागळे इस्टेट.
स्वागतयात्रेवरील विघ्न झाले दूर
By admin | Published: March 28, 2017 5:47 AM