जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, डहाणू, वाडा तालुक्यांसह अनेक भागांतील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचेच साम्राज्य पसरलेले आहे. अनेक ठिकाणी रस्ता गायब होऊन फक्त खड्डेच दिसत असल्याने वाहन-चालकांना खड्डे चुकवण्याऐवजी रस्ताच शोधावा लागत आहे. तसेच एरवी २५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी आता तासाभराचा वेळ वाया जात असल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत.
दरवर्षी पावसाचे वावडे असणाऱ्या त्र्यंबकेश्वर-मोखाडा रस्त्याची यंदाही दैना झाली आहे. सध्या या रस्त्यावर फक्त खड्ड्यांचेच साम्राज्य पसरले आहे. जव्हार ते मोखाडा आणि मोखाडा ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याची यंदाच्या पावसाळ्यात दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी अक्षरश: रस्त्यावरच तळे साचले आहे.
यामुळे नेमका खड्डा किती मोठा आहे याचाही अंदाज वाहनचालकांना येणे कठीण बनल्याने अपघातही होत आहेत. याशिवाय मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्ता अगोदरच घाट रस्ता असून त्यातच खड्डे पडल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु मागील वर्षी हाच रस्ता सां. बा. विभाग मोखाडा यांनी दुरुस्त केला होता. यामुळे हा रस्ता नूतनीकरण होईल तेव्हा होईल, मात्र सध्या या रस्त्यावरील खड्डे तरी किमान भरावेत, अशी अपेक्षा जनतेकडून करण्यात येत आहे.
भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग, कुडूस-चिंचघर-देवघर रस्ता, डाकिवली-चांबले-केळठण आदीसह तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आजारी, आबालवृद्ध, गरोदर माता भगिनींना या रस्त्यांवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत.
तालुक्यातील संपूर्ण रस्त्यांची वाताहत झाली असून रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीस योग्य करण्याची मागणी केली आहे. अन्यथा स्वाभिमान संघटना कोरोना महामारीतही नियमांचे पालन करून जनतेच्या हितासाठी आमरण उपोषण करेल, असा इशारा स्वाभिमान संघटनेने दिला आहे.