ठाणे : ठाणे शहरात गुरुवारी सेवा सहयोग फाउंडेशन, ठाणे व बिग बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन यांच्या सहकार्याने ठाणे शहरात घरोघरी वर्तमानपत्र टाकणाऱ्या एकूण ४५ गरीब व होतकरू मुलांना मोफत कपडे वाटप करण्यात आले.
अनेक गरीब मुलांना आपल्या परिस्थितीमुळे शिक्षणाबरोबर हे काम करावे लागते त्यांना मदतीचा हात म्हणून सेवा सहयोग संस्था गरजू गरीब विद्यार्थ्यांना व शाळांना कपड्यांपासून तर शालेय साहित्य वाटून मदतीचा हातभार लावत असते. प्रसंगी सेवा सहयोग संस्थेचे किशोर मोघे, अमृता संभुस, संकेत कुलकर्णी व गणेश धनावडे व ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे दत्ता घाडगे, वैभव म्हात्रे व गणेश शेडगे उपस्थित होते. तर वर्तमानपत्रांच्या कंपनी प्रतिनिधी म्हणून रोहित पिल्ले, अरुण देशमुख व संतोष पडवळ उपस्थित होते.