लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या या कालावधीनंतरही १ ते ६ वर्षांच्या बालकांसह जिल्ह्यातील १९ वर्षीय युवा-युवतींच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आदी आरोग्ययंत्रणेकडून आठवडाभर म्हणजे ८ मार्चपर्यंत ’एलबेनडॉले’ या औषधी गोळ्यांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. या गोळ्या देऊन या युवा-युवती व बालकांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
जिल्ह्याभरात या आधीच पोलिओ डोस देण्याच्या दृष्टीने सक्रिय असलेल्या यंत्रणेव्दारे व आरोग्यविभाग आणि अंगणवाडीसेविका, मदतीस यांच्याद्वारे या औषधी गोळ्या वाटप करण्यात येत आहे. यामुळे या बालकांसह शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे शक्य झाले आहेत. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून झाला आहे. या गोळ्यावाटपाची ही मोहीम ८ मार्चपर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.